मजाक जिवावर बेतू शकतो
मजाक जिवावर बेतू शकतो नेमकाच पाडवा झाला होता. सुगीचे दिवस सुरू होते. सुभानराव च्या रानातील जेवारी काढणी सुरू करून दहा दिवस झाले. जेवारीची पसार रानात पसरलेली होती. पेंढ्या बांधून झाल्या. कणसं खुडणीला उद्या मंगळवारी सुरू करणार होते. आज सोमवार प्रचंड उकाडा जाणवत होता. तिन्ही सांजची येळ झाली. झाकडं पडत आलं. सुर्यनारायण केंव्हाच मावळतीला गेला. रानातल्या बाया कवाच घरी पवचल्या. चुलीवर भाकरी थापल्याचे 'थप थप' आवाज कानावर ऐकू येवू लागले. सरपण ओलसर असल्याने भागामायची चूल पेटतच नव्हती. फुकणीने फूकन फूकून पार तिचं डोळे लालेलाल झाले. लाकडं पुढ सरकवली जात होती. आता कुठं जाळाने पेट घेतला. भाकरी संपून तिनं पाटा-वरवटा हाती घेतला. काळं वाटण वाटून वांग्याचे कालवण करण्याचा बेत होता. सुभानराव कडे पाच सालकरी होते. शामरावने बैलाला वैरण टाकली. सुगी असल्याने आखाडा जेवारी च्या रानात टाकलेला होता. इतर तिघेजण तिथंच बाजूला कलंडले. आज दामुअण्णा चा गावात भाकरी आणण्यासाठी जाण्याचा नंबर होता. दामुअण्णा जरा घाबरटच. तो कायम कोणाच्या न...