मजाक जिवावर बेतू शकतो
मजाक जिवावर बेतू शकतो
नेमकाच पाडवा झाला होता. सुगीचे दिवस सुरू होते. सुभानराव च्या रानातील जेवारी काढणी सुरू करून दहा दिवस झाले. जेवारीची पसार रानात पसरलेली होती. पेंढ्या बांधून झाल्या. कणसं खुडणीला उद्या मंगळवारी सुरू करणार होते. आज सोमवार प्रचंड उकाडा जाणवत होता. तिन्ही सांजची येळ झाली. झाकडं पडत आलं. सुर्यनारायण केंव्हाच मावळतीला गेला. रानातल्या बाया कवाच घरी पवचल्या. चुलीवर भाकरी थापल्याचे 'थप थप' आवाज कानावर ऐकू येवू लागले. सरपण ओलसर असल्याने भागामायची चूल पेटतच नव्हती. फुकणीने फूकन फूकून पार तिचं डोळे लालेलाल झाले. लाकडं पुढ सरकवली जात होती. आता कुठं जाळाने पेट घेतला. भाकरी संपून तिनं पाटा-वरवटा हाती घेतला. काळं वाटण वाटून वांग्याचे कालवण करण्याचा बेत होता. सुभानराव कडे पाच सालकरी होते. शामरावने बैलाला वैरण टाकली. सुगी असल्याने आखाडा जेवारी च्या रानात टाकलेला होता. इतर तिघेजण तिथंच बाजूला कलंडले. आज दामुअण्णा चा गावात भाकरी आणण्यासाठी जाण्याचा नंबर होता. दामुअण्णा जरा घाबरटच. तो कायम कोणाच्या ना कोणाच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करायचा. आज मात्र त्याला एकट्याला कडूसा पडल्यावर गावाचा रस्ता धरण्याची येळ आली. कसाबसा आव आणत गडी गावात पोहोचला. चहाचं डिकाशन घेतला. भागामायला भाकरी बांधायला सांगितली. इतर तिघांच्या भाकरी गोळा करण्यासाठी दामुअण्णा हातात मोठं टोपल घेवून प्रत्येकाच्या घरी निघाला. मोठ्या टोपल्यात तिघांच्या घरून भाकरीच गठुडं आणि कालवणाचा तांब्या टोपल्यात ठेवून अण्णा स्वतः च्या घरी पोहोचला. भागामाय भाकरी बांधून आणि तांब्यात वांग्याची भाजी भरून अण्णांची वाटच बघत बसली होती. खोकरण्याच्या आवाजाने अण्णा घराकडे येत आहेत हे तिनं अचूक हेरले. टोपल्यात स्वतःची भाकरी आणि कालवणाचा तांब्या ठेवला. दामुअण्णाने रुमालाची चुंबळ केली आणि डोईवर टोपले घेऊन रानाच्या दिशेने झेपावला.
दामुचा सवंगडी विकास जरा कलाकारच. त्यानं ठरवले की, आज दामुअण्णाची फजीती करायची. त्याला माहित होतं की, दामू लई घाबरट आहे. तसा तो एकटा कधी घावतच नाही. आज मात्र नामी संधी आली आहे त्याला भेडवायची. गावाच्या खालच्या पांदीला लागताच दामुअण्णाची पावलाची गती कमी झाली. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. रामरक्षा संपून हनुमान चालीसा सूरु झाली. तळणीचा ओढा जवळ आला. या ओढ्यात अनेकांना भुतबाधा झाली होती.जड पावलांनी कसाबसा ओढा पार केला. मात्र खरी कसोटी यांच्या पुढं होती. ओढ्याची चढण सुरु झाली. ती संपली आणि सरळ गाडीवाट लागली की, माडूकाचे झाडं लागते. या झाडावर हडळं राहते असे अनेकांनी सांगितलेले होते. अण्णाच्या पावलांची गती आणखीनच मंदावली. विकास आखाडा सोडून तळणीच्या ओढ्याच्या काठी असलेल्या माडूकाच्या झाडाजवळ बसला. मोठे तीन सेल असलेली बॅटरी चा उजेड आणि चंद्राच्या उजेडात उंचीवरून दामुअण्णा जवळ आल्याची विकास ने खात्री करून घेतली. जसा अण्णा ओढ्याची चढण संपून गाडीवाटला लागणार, माडूकाच्या झाडाजवळ येताच विकास ने मोठ्याने 'मी येवू का? मला आज तुया बरोबर जेवायचे आहे' म्हणून माडूकाच्या खोडामागून आवाज देत राहीला. इतक्यावरच थांबला तर तो विकास कसला? आणखी चित्रविचित्र आवाज काढू लागला. हे करताना विकासने तोंडाजवळ लुंगी धरली. त्यामुळे हा आवाज ओळखीचा वाटण्याचे कारण राहीले नाही. दामुअण्णाचे अवसान गळाले. त्याच्या अंगाला कापरं भरलं. इतक्या उकाड्यातही घामाघूम झाला. अंगावरचे बनेल केंव्हाच ओलेचिंब झाले. या हडळा च्या आवाजाने अण्णाची बोबडी वळाली. बॅटरी चा उजेड असतानाही अण्णाला समोरचं काहीच दिसेना. सरळ रस्त्यात त्याला भोवळं आली. भाकरीचं टोपल पालथं झालं. सगळे कालवण मातीत मिसळले अण्णा जाग्यावर बेशुद्ध झाला. विकासला त्याची चूक उमगली. त्याने जवळ येत अण्णाला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. अण्णा थंडगार आणि बेशुद्ध पडलेला होता. पळत आखाड्यावर जावून विकासने इतर दोघांना बोलावून आणले. येताना बैलगाडी जुपून आणली.
बैलगाडीत तिघांनी मिळून अण्णाला टाकले. मात्र आपण केलेली करामत सांगण्याचे धाडस विकासला करावेच वाटले नाही. कारण त्याची पाचावरच धारण झाली होती. जाणत्याकडे निम्म्यारात्री आणण्यात आले. जाणत्याने अंगारा -धूपारा केला. मात्र अण्णांचे अंग आणखी गरम होत होते. जाणत्याने अण्णांची खराब होत चाललेली हालत पाहून सांगितले की, तुम्ही येळ वाया घालवू नका. ताबडतोब बाजूच्या गावच्या डाक्टराकडे न्या. येळेवर दवापाणी झालं तरच अण्णा वाचेल. विकासच्या छातीची धडधड आणखीनच वाढली. पहाटेच्या वेळी बाजूच्या गावच्या डाक्टराकडे नेण्यात आले. त्याने इंजेक्शन टोचले आणि काही गोळ्या दिल्या. उजेडतं आलं, अण्णांची ताप कमी झाली. अण्णा शुद्धीवर आला. न्याहारी करताना ओशाळलेला विकास अडखळत अडखळत माडूकाच्या झाडाजवळून केलेली करामत सांगू लागला. अण्णाच्या डोळ्यात पाणी तरळले. विकासने अण्णाचे पाय धरले, यापुढे असा मजाक करणार नाही.अण्णाचा चेहरा लालबुंद झाला. त्यांना म्हणायचे होते मात्र ते न बोलताच दिसून आले की, 'मजाक एक दिवस जीव घेईल'.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment