बालपण हरवत चाललंय

बालपण हरवत चाललंय

 बालपण म्हणजे निरागस, निर्विकारपणे व्यक्त होण्याची संधी. गतकाळात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानाची गरज पडत नव्हती. सगळीकडे भलेमोठे मैदानच होते. आजूबाजूला फार मोठी बांधकामे झालेली नव्हती. वाटेल तेथे, वाटेल तो खेळ, वाटेल तेंव्हा खेळण्याची परवानगी होती. आजच्या काळातील फारशी बंधने नव्हती. पक्षी जसा स्वच्छंदी जीवन जगतो, अगदी तसेच जीवन या चिमुरड्यांच्या वाट्याला होते. मात्र बदलत्या काळानुसार बदलत्या अपेक्षेने मनमोकळे खेळण्यावर बंधनं आली. ख-याखु-या जीवनाला पारखे होत चाललेल्या चिमुकल्यांच्या हरवत चाललेल्या बालपणावर या लेखात ऊहापोह करू.
         आपण आपल्या लहानपणात डोकावले तर अनेक गोष्टींचा धांडोळा समोर येईल. पाऊस भरपूर पडायचा, सर्वत्र चिखल असायचा. या चिखला पासूनच खेळण्यास सुरुवात व्हायची. अंगणात किंवा थोड्याच अंतरावर वर असलेला चिखल खेळायला उपयोगी पडे. त्यापासून जशी कल्पना सुचेल, ते बनवता येत होते. बैल, गाय, म्हैस, माणूस, रेडिओ, गणपती, मंदिर, किल्ला, टुमदार घर, सायकल अशा कितीतरी बाबींची वेडीवाकडी निर्मिती केली जायची. पाऊस भरपूर पडत असल्याने कागदाच्या किंवा मोठ्या वृक्षांच्या पानांच्या सहाय्याने तयार झालेल्या बोटी दारासमोरील प्रवाहात सोडल्या जायच्या. 
         लंगडी, लपाछपी, चोर-पोलीस, सुरपाट्या, सुरपारंब्या, नदी किंवा विहिरीतील तासनतास पोहोणे, सागरगोटे, कचकारंज्या, गोट्या, दोरीवरील उड्या, विटी-दांडू, कबड्डी, चिखलात गज रोवणे, खो-खो, धप्पा-कुटी, कुस्ती सारखे इनडोअर आणि आऊटडोअर खेळ खेळायला कोणताही खर्च नव्हता. कुठेही क्लास लावण्याची गरज नव्हती. खेळाचे नियम शिथिल आणि लवचिक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे बंधन नसायचे. दोन-चार मित्र-मैत्रीणी गोळा झाल्या की, खेळाला सुरुवात व्हायची, आणि मनाला वाटेल तेवढा वेळ खेळाचा मनसोक्त आनंद लुटला जात होता. नदीवर पोहायला गेल्यानंतर पाण्यात सुद्धा बुडी घेऊन समोरच्याला पकडण्यात सुद्धा मजा काही औरच. अगदी तीन-चार तास नदीत पोहूनही मन भरत नसे. सकाळी उठल्यापासून जसा वेळ मिळेल तसा खेळाच्या सत्कारणी लागायचा. साधारणपणे शाळेची वेळ सकाळी दहा ते दुपारी चार च्या दरम्यान असायची. दुपारी दोन तास जेवणाची सुट्टी मिळायची. या सुट्टीतील अर्धा अधिक वेळ पुन्हा खेळण्यासाठी खर्ची जायची. सायंकाळी शाळेला सुट्टी झाली रे झाली की, पुन्हा खेळायला सुरुवात व्हायची. मनाला वाटेल तो खेळ आणि मनाला येईल तितका वेळ. आई-वडील शेतातून येईपर्यंत दंगामस्ती चालायची. गरमगरम भाजी-भाकरीवर ताव मारून फेरफटक्याच्या निमित्ताने पुन्हा काही तरी खेळण्याची संधी मिळायची.
         नागपंचमीला धोक्यांची धमाल असायची. मोठे मोठे झाडं पंचमीच्या चार पाच दिवस आधीच बुकिंग करून ठेवली जात. बोरांच्या सीझनमध्ये बोरं. बोरं अगदी वाळवून ठेवली जात, कारण त्याच नंतर बोरकुट करता येत होते. जांभळाच्या दिवसात जांभूळ. उंच जांभळीवर चढून बारीक फांद्या मोठ्याने हलवून जाभळांचा सडाच खाली पडायचा. कपड्यावर पडलेल्या जांभळाच्या न निघणा-या डागांमुळे आईचे बोलणेच काय तर प्रसंगी धपाटे बसायचे. गावरान आंबे तर गोडीच वाढवायचे. भल्या पहाटे झाडाखाली पडलेला पाडाचा आंबा खाण्याची मजा वेगळीच. पाडाचे आंबे नाही मिळाले तर पक्क्या कै-या गव्हाच्या काडाखाली किंवा तुरीच्या भुस्कटाखाली पिकवायला ठेवल्या जात. पाच सात दिवसांनी त्यांचा आंबा तयारच. तुरीच्या शेंगा मीठ टाकून उकडून खाण्यात वेगळाच आनंद असायचा. मुगाच्या शेंगा पौष्टिक जीवनसत्त्वात भर टाकायच्या. भुईमुगाच्या शेंगाचा हुळा चवदार लागायचा. गहु, ज्वारी, बाजरीचा नरम आणि गरम हुरडा पंचपक्वान्नापेक्षा जादा चव द्यायचा. ज्वारीची कणस भाजायला केलेली आगटी व पोत्यावर सोललेल्या कणसाला चौघांनी चारी बाजू पकडून धांडाच्या सहाय्याने दिलेले फटके चवदार ज्वारीचा हुरडा मिळवून देत. गव्हाच्या ओंब्या आणि बाजरीचे कणीस हातावर चोळताना गरम असले तरी चटके सहन करण्याची क्षमता होती. हरभर-याचे भरलेले घाटे खाताना त्याची आंब धुण्याचे कष्ट सुद्धा घेतले जात नव्हते. उसाचे गु-हाळ जेथे सुरू आहे, तेथील शेतकरी कोणालाही रस, पाक, गुळ खायला अडवत नसतं. गरम चक्कीचा गुळ उसाचे टीपरु आधन आलेल्या व ओतलेल्या कढईत फिरवले जायचे. गु-हाळात तेथे खाण्या-पिण्यास परवानगी होती. लहान असल्याने सोबत मात्र काहीही आणता येत नव्हते. 
         शाळा शिकायची म्हणजे करिअर करण्यासाठी अशी संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. गावात शाळेत जेवढ्या इयत्ता आहेत, तेवढेच शिकणे अभिप्रेत असायचे. माध्यमिक शिक्षणाच्या तालुक्यात फार तर पाच सहा शाळा असायच्या. पोस्टातून आलेले पत्र वाचायला कोणाला तरी शोधावं लागे. पुर्व प्राथमिक शिक्षण ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे बालवाडी, अंगणवाडी मुक्त गावे होती. म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत शिक्षणाचा श्रीगणेशा होत नव्हता. सहावे वर्ष तरी कधी समजायचे? कारण पालकचं शिकलेले नव्हते. गावात मुश्किलीने तीन चार लोक सातवी किंवा दहावी पर्यंत शिकलेले असायचे. त्यावर्षी दुष्काळ पडला होता त्यानंतर तीन महिन्याने पहिल्या गुरूवारी मोठ्याचा जन्म झाला, असे उद्गार गुरूजींना ऐकायला मिळायचे. गुरुजी उजव्या हाताने डाव्या कानाला हात लावायला सांगायचे. मधील गुरुजींनी ठरवलेली तारीख म्हणजे जन्मतारीख ठरायची. जून, जूलै किंवा आणखी काही अशी तारीख निर्गमवर नोंदवली जाई. चौथी, सातवी ला बोर्डाची परीक्षा होती. ही बोर्ड परिक्षा देताना मेडिकल, इंजिनिअरींग पेक्षा भारी वाटायचे. भल्या पहाटे बैलगाडीतून बोर्ड असलेल्या शाळेच्या ठिकाणी दाखल व्हावे लागे. शिक्षणातील गळतीचे प्रमाण ऐंशी टक्क्यांहून अधिक होते. त्यामुळे फार नशीबवान दहावी पर्यंत मजल मारत. उच्च शिक्षण तर स्वप्नवत होते. शाळेत सुकडी मिळायची. सुकडी वाटपाच्या वेळी शेतात आई-वडीलांना मदतीसाठी काम करणारी मुलं देखील लक्षणीय संख्येने उपस्थित राहात.         
         गावातील गणेशोत्सवात दहा दिवस विद्यार्थी गर्क असायचे. होळी ला तर पंधरा दिवस आधी पासून गोव-या, लाकडे गोळा करण्यास सुरुवात व्हायची. ज्याने विरोध केला त्याचा होळी दिवशी व धुरवडी दिवशी उद्धार केला जायचा. त्याच्या परसातील लाकडे, गोव-या रात्रीतून होळीत जळायच्या. धुरवडीला अंगाला होळीची राख फासली जाई. तेथील विस्तव किंवा निखा-यावर पाणी तापवून अंघोळ केल्याने आजारी पडत नाही असा समज असायचा. नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या तयारीत जात. दिवाळी म्हणजे नविन पदार्थाची रेलचेलच. स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि इतर साहित्याची आतुरतेने वाट पाहीली जायची. घरीच बनवलेले सर्व पदार्थ हे गावातील तेलाच्या घाण्यातील शुद्ध तेलाचे तळलेले होते. वळीव लाडू, करंज्या, शेव, पोहे सारखे मर्यादित पदार्थ दिवाळीत आनंद द्विगुणित करीत. उटणे सुद्धा घरीच तयार केलेले होते. 
        आज खेळांची मैदाने आली. त्याची संख्याही मर्यादित. त्यासाठी पैसे मोजावे लागतात. शिक्षणाची सुरुवात तर दोन अडीच वर्षापासून होते. ज्याला संडासला कसे बसावे हे कळत नाही, त्यावयात प्ले-ग्रुप, नर्सरी च्या वर्गात जावे लागते. शहरच काय तर ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पिकं आले आहे. त्याचे बालपण दप्तराच्या ओझ्याखाली आणि पालकांच्या अपेक्षांच्या आशेपायी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालकांची मुलांप्रती असलेली भविष्याची चिंता मुलांना जीवनातील आनंदापासून, सर्व गोष्टींपासून दूर नेत आहे.

डॉ.गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात