विजेचा धक्का
विजेचा धक्का घरची 🏡 आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. काम केलं तरच चूल पेटणार होती. गयाबाई शेजारच्या सखु सोबत कपाशी निंदायला गेली. आज सुर्यनारायण जरा प्रखर वाटत होता. अंगाची लाही लाही होत होती. घामाच्या धारांनी अंग चिंब भिजले. ☁️ ढग दाटून आले. सायंकाळची वेळ झाली. पावलं घराच्या दिशेने झपाझप पडू लागली. चूलीला सरपण म्हणून बांधावरील पळाट्याचा भारा गयाबाईने डोक्यावर घेतला. ✋ हातात पाण्याला घेतलेलं कोळंब होतं. दुपारी भाकरी 🍞 खाऊन रिकामं झालेलं धुडकं, कालवणाचा तांब्या आणि थाटली सखुच्या घमेल्यात दिली. अर्धा रस्ता पार पडतो की नाही पडतो, तोच वरूणराजाने बरसायला सुरूवात केली. पावसाचा जोर वाढत होता. जवळच्या लिंबाच्या झाडाखाली दोघीजणी स्थिरावल्या. रस्त्याच्या कडेला असल्याने आणि सायंकाळी घरी जायची वेळ झाल्याने व पावसाने गाठल्याने या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली आणखी बाया-माणसं आडोशाला थांबली. बाजूलाच चिमणरावचा आखाडा होता. चिमणराव आपल्या यदा या सालगड्या सोबत आऊत सोडून ऊसाच्या पाचटाने शेकारलेल्या गोठ्याजवळ जाण्याच्या बेतात होता. पाऊस उघडायचे नावंच घेत नव्ह...