विजेचा धक्का
विजेचा धक्का
घरची 🏡 आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. काम केलं तरच चूल पेटणार होती. गयाबाई शेजारच्या सखु सोबत कपाशी निंदायला गेली. आज सुर्यनारायण जरा प्रखर वाटत होता. अंगाची लाही लाही होत होती. घामाच्या धारांनी अंग चिंब भिजले. ☁️ ढग दाटून आले. सायंकाळची वेळ झाली. पावलं घराच्या दिशेने झपाझप पडू लागली. चूलीला सरपण म्हणून बांधावरील पळाट्याचा भारा गयाबाईने डोक्यावर घेतला. ✋ हातात पाण्याला घेतलेलं कोळंब होतं. दुपारी भाकरी 🍞 खाऊन रिकामं झालेलं धुडकं, कालवणाचा तांब्या आणि थाटली सखुच्या घमेल्यात दिली. अर्धा रस्ता पार पडतो की नाही पडतो, तोच वरूणराजाने बरसायला सुरूवात केली. पावसाचा जोर वाढत होता. जवळच्या लिंबाच्या झाडाखाली दोघीजणी स्थिरावल्या. रस्त्याच्या कडेला असल्याने आणि सायंकाळी घरी जायची वेळ झाल्याने व पावसाने गाठल्याने या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली आणखी बाया-माणसं आडोशाला थांबली. बाजूलाच चिमणरावचा आखाडा होता. चिमणराव आपल्या यदा या सालगड्या सोबत आऊत सोडून ऊसाच्या पाचटाने शेकारलेल्या गोठ्याजवळ जाण्याच्या बेतात होता. पाऊस उघडायचे नावंच घेत नव्हता. चिमणरावच्या हातात चिंगी गाईचा दोर होता. पावसाच्या जोराने 🐄 गाय उधळली. ती थेट आपलं वासरू असलेल्या गोठ्यात येवून वासराला चाटू लागली. चिमणराव तावातावाने मनातल्या मनात काहीबाही बोलत होता. मात्र गाय नेमकी गोठ्यात पाहून त्याच्या जीवात जीव आला. त्यान चिंगीच्या गळ्याचा कासरा काढला आणि गव्हाणीजवळ असलेल्या दोरखंडाने खुटीला ला जोरकस आवळला.
तोवर यदा चारी बैल गोठ्याच्या दिशेने हाकत होता. पावसाच्या मोठ्या सरींमूळे यदाला जास्त पुढचं दिसत नव्हते. मात्र पायाला परिपाठ असल्याने तो गोठा जवळ करू लागला. त्यातील लाल्या नावाच्या बैलाला जाताना आणि येताना दिसतील ती गवत, पिकं खाण्याची सवय होती. लाल्या सवयीप्रमाणे या ठोक पावसात आपली चालं सोडायला तयार नव्हता. पडत्या पावसात इतर तीन बैलांनी गोठा जवळ केला. चिमणराव त्यांच्या येसणं व मोरक्या धरून एका एकाला दावणीला बांधू लागला. गव्हाणीत बैलांना वैरण टाकून चिमणराव यदाची वाट पाहू लागला. तेवढ्यात आकाशात कानठळ्या बसतील असा आवाज झाला. विज कडाडली होती आणि जवळपासच कुठंतरी पडली असावी, असा चिमणरावचा कयास होता. तिन्ही बैलं बांधून झाल्यावर लाल्या का आला नाही व यदा काय करतोय याचा अंदाज घेण्यासाठी चिमणराव पाठमोरा वळला. समोर दिसणा-या गोष्टीवर त्याचा विश्र्वासच बसेना. लाल्या आडवा पडून जिवाच्या आकांताने गडाबडा लोळत होता. तर यदा जमीनीवर आडवा पडला होता. चिमणराव धावतच पुढे गेला. बघतो तर काय, त्या कडाडणा-या विजेने लाल्याचा आणि यदाचा घात केला होता. 🔥 आगीच्या ज्वाळाने दोघांनाही होरपळून काढलं होतं. यदा कडे पाहावे अशी त्याची अवस्था नव्हती. त्याचे धोतर आणि खमीस जळून कोळसा झालं. अंगाचा अर्धा भाग जळाल्याने तो निपचीत पडला होता. लाल्या थोडा पुढं असल्याने त्याचा ढोपरावर तो आगीचा लोळं पडला होता. मात्र त्याच्या ताकदीपुढं त्यानं त्याची तसदी घेतली नाही. मात्र कोसळून दोन-तिन मिनिटं झाली असावीत आणि त्याला प्रचंड वेदणांचा त्रास होत असावा. लाल्या गडाबडा गडाबडा लोळत होता. मात्र दोधारी पडत्या पावसात त्याच्यावर काहीच उपचार करता येत नव्हते. निपचीत पडलेल्या येदाची नाडी चिमणरावने ✋ हातात घेतली आणि त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. गोठ्या जवळ अवघ्या वीस फुटाच्या अंतरावर हा सर्व प्रकार घडला होता. ती वीज आणखी एक मिनीट उशीराने पडली असती, तर कदाचित पुढील अनर्थ टळला असता. रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाखालील मंडळींना हे सर्व हाकेच्या अंतरावर असल्याने वीज जवळपास पडल्याची खात्री झाली. लाल्याने हातपाय खोडणे बंद केले. मदतीच्या आकांताने चिमणराव मोठमोठ्याने ओरडू लागला. लिंबाच्या आडोश्याला बसलेल्या एक-दोन जणांनी त्याची आरोळी ऐकली. त्या पडत्या पावसात लिंबाखालचा सर्व घोळका चिमणरावच्या आखाड्याच्या दिशेने पळू लागला. जवळ येऊन पाहिलं तर काय गोठ्याबाहेर लाल्या निपचीत पडला होता. आणि गोठ्यात यदाच्या जवळ चिमणराव 😭 रडतं बसला होता. हे भयानक चित्र पाहून प्रत्येकाच्या काळजात धस्स झालं. गयाबाई ने यदाला पाहून टाहो फोडायला सुरुवात केली. कारण तो तिच्या कुंकवाचा धनी होता. सखु तिला सावरण्याचा प्रयत्न करीत होती.
डॉ गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment