जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

 

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?  

    मानवाने सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. जंगलात राहणारा आदिमानव ते एकविसाव्या शतकातील प्रगती पथावरील पांथस्थ असा प्रवास घडला. लाईट, टेलिफोन, वाफेचे इंजिन, विमान, जहाजे, संगणक, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान असे नवनवीन शोध लावत सर्वच क्षेत्रात बदल घडवून आणले. पृथ्वी अपुरी पडू लागल्याने इतर ग्रहांचा आसरा शोधू लागलो. पुर्वी एक किलोमीटर जायला दहा ते पंधरा मिनिटे लागत होती, आज हजारों किलोमीटर चे अंतर काही तासांत पादाक्रांत करता येते. थोडक्यात विविध क्षेत्रातील अमुलाग्र बदलामुळे जीवनमान उंचावले. मात्र ही प्रगती करीत असताना काही पावले काळाच्या ओघात अधोगतीकडे कधी वळली, याचा विचार करायला उसंतच नाही. खेड्यात जोडणी (माळवद), आरसीसी च्या पक्क्या घरात राहणारे असो की शहरात आयटी क्षेत्र किंवा कोणत्याही परिस्थितीत कार्य करणारे चाकरमानी किंवा कामगार असोत. शहरी किंवा ग्रामीण भागातील आई-वडिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही अपवाद वगळता इतरांना हे ओझे का वाटावे, काळजी घेणा-या महत्भागी मुलांचे स्वागच. मात्र या गंभीर प्रश्नावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.

       ग्रामीण भागात ज्यांच्या कडे भरपूर शेती होती किंवा आहे तसेच शेती नसणारे कष्टकरी असूद्या, ज्या आई-वडिलांनी आपणास जन्म दिला, हाडाची काडे करून लहाणाचे मोठे केले, प्रसंगी एकवेळ जेवले, अर्धपोटी - उपाशी झोपले. त्यांच्या घासातला घास खाऊ घातला. मात्र आपणास त्याचा मागमूसही लागू दिला नाही. आपणास सर्वकाही पुरवले, शिकवले, नोकरीस लावले, आहे ती शेती उत्तमरीत्या सांभाळली किंवा वाढवली, त्यांच्या वाट्याला आज काय दिवस आलेले आहेत? गावात लग्न झाले की, एका महिन्याच्या आत मुलगा बायकोसह आई-वडिलांपासून वेगळा राहू लागला. ज्यांना भरपूर शेती आहे, असे तीन किंवा चार भाऊ आई एकाकडे तर वडील दुसऱ्याकडे अशी त्यांची वाटणी करू लागले. ज्यांना फक्त आई किंवा वडील या दोहोंपैकी एक आहे ते तर एक एक महिना त्यांना याच्या घरी, नंतर दुसऱ्याच्या घरी ठेवत आहेत. मुलं जीव लावत असली तरी सुना लावतीलच यांची कोणतीही खात्री नाही. सासूला सुनेचे टोचून दिलेले बोलणे ऐकण्याशीवाय गत्यंतर नाही. अनेक माय किंवा बाप मुलगा सोडून मुलीच्या घरी राहात असल्याची उदाहरणे कमी नाहीत. त्यांचे स्वतःचे घर, वाडा असूनही मंदिर, चावडी, सार्वजनिक जागा किंवा मोठ्या वृक्षाचा दिवसाच काय तर रात्री सुद्धा आसरा घ्यावा लागतो. आपली पुरुषसत्ताक पद्धती असल्याने मुलाने आई-वडिलांचा सांभाळ करणे अपेक्षित आहे. ज्या म्हातार वयात आरामाची, आधाराची गरज आहे, त्या उतारवयात दळण करणे, धुणीभांडी धुणे, शेतात खुरपणीला जाणे त्या माय-माऊलीला आजही चुकत नाही. बापड्याचे हाल तर न विचारलेले बरे. त्याला सांगताही येत नाही. न व्यक्त होताच शेवट झाल्याची असंख्य उदाहरणे मिळतील. 

        शहरी भागात या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हा गंभीर विषय आहे. ज्यांच्या कडे पैसा असूनही दानत नाही अशा महाभागांचे तर कठीण काम आहे. ज्या वयात आई-वडिलांना मानसिक जवळीकतेची गरज आहे, नेमक्या त्याच वयात जर वृद्धाश्रम सारखा पंगू सहारा मिळत असेल तर दुर्दैव त्यांचे. घरी कुत्रे, मांजरी सांभाळतील,(प्राणी सांभाळायला आक्षेप नाही) मात्र जन्मदात्या चे ओझं वाटत असेल तर कुठे फेडणार हे पाप? उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या नोकरदार मुलांच्या आई किंवा वडीलांना पैसे देऊन कोणाला तरी दवाखान्यात न्यावे लागते. या वयात एकटे राहण्याचे धारिष्ट्य बाळगावे लागते. विदेशात राहणारे अनेकजण जर मात्या-पित्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांच्या साठी शब्दच शिल्लक नाहीत. काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून या विधीसाठी सहभाग नोंदवल्याची उदाहरणे आहेत. तर काहींनी आमचे येणे शक्य नाही, तुम्ही अंत्यसंस्कार करुन घ्या असा फोन वरून निरोप देणा-या निलाज-या औलादी पोटी येतातच कशा, हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी तर गावक-यांनी त्यांचे क्रियाकर्म उरकल्याची उदाहरणे ऐकावयास मिळत आहेत. काही वृद्धाश्रमात प्राध्यापक, इंजिनिअर, वकिला बरोबरच न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याचे सुद्धा दिसतात.

       ग्रामीण भागात या बाबतीत चित्र दिलासादायी असले तरी सुखावह नक्कीच नाही. आई-वडिलांची होणारी कुचंबणा कधी कमी होणार? शहराच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना शेवटचा श्वास तरी सुखा-समाधानाने घेता येईल का? याचा तुम्ही -आम्ही कधी विचार करणार? या लेखात वृद्ध माता-पित्या विषयी व्यक्त केलेले विचार हे सत्य आहेत. आई-वडिलांची काळजी घेणारे आहेत, मात्र त्यांची संख्या कमी होत चालली आहे. मुलगा काळजी घेत असेलही, मात्र त्याच्या बायकोची धुसफूस कधी संपणार? दिवसभर मुलगा घरी नसतोच. म्हणून वृद्ध माता-पित्या हे हाल खरोखरच समुळ नष्ट करायचे असतील तर सुनेला मुलीची भूमिका पार पाडावी लागेल. जर सुनेला ही भुमिका पार पाडता आली तर आपोआपच माहेरी असलेल्या तिच्या माता-पित्याची काळजी तिची भावजय निश्चित घेईल. एकविसाव्या शतकात आपण मुला-बाळांच्या शिक्षणावर, करिअर वर प्रचंड पैसा खर्च करतो. ही समाधानाची व काळाच्या गरजेची बाब आहे. मात्र अगदी याच धारणेने आई-वडिलांची सेवा केली तर आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. आणि हे करताना सर्वांनी एकच ध्यानात ठेवावे की, एक ना एक दिवस आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. आपण मुलगा म्हणून जन्मदात्याला दिलेली वागणूक आपला मुलगा आपल्याला सुद्धा देवू शकेल. आई-वडिलांचा सांभाळ करण्यास मार्गदर्शन करणारे चळवळ म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे आजचा विचार हे उद्याचे भविष्य आहे. चांगले -वाईट प्रत्येकाला कळले, मात्र वळत नाही. आपले जर हाल होवू द्यायचे नसतील तर आज त्यांचे हाल करू नये, ही हात जोडून अपेक्षा.

डॉ.गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय