नकार पचावायला शिका

 नकार पचावायला शिका

        एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक अशा विविध बदलांमुळे जग जवळ आलं. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यापुढे जावून मानवतेच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले. स्त्री-पुरूष समानतेचे वारे वाहू लागले. शिक्षणामूळे मुला-मुलींना घरापासून, आई-वडीलांपासून दूर राहावे लागले. शालेय, महाविद्यालयीन जीवनात मुला-मुलात, मुली-मुलीत जवळीकता वाढून मैत्री निर्माण झाली. मुला-मुलीतही मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले, जे काळानुरूप आवश्यक होते. मात्र यातून काही गैरप्रकार समोर आले. ज्यामुळे आई-वडीलांच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाले. दर्शना पवार ची झालेली हत्या हे त्याचेच प्रतीक ठरते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मात्र वेळप्रसंगी समोरून नकार असेल तर तो पचवण्याचे औदार्य मुलाने किंवा मुलीने दाखवले पाहिजे. यातून त्याचा/तिचा बळी तर जातोच शिवाय घरच्यांचे हाल होतात. 

         शहरी भागातील पालक राहतात त्या ठिकाणी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी किमान सोबत तरी असतात. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी राहावे लागले तर त्यांनासुद्धा नातेवाईक, वसतिगृह किंवा खाजगी घराचा आधार घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील पालकांना तर माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणापासून मुलांना बाहेर ठेवावे लागते. चांगले मित्र-मैत्रिण असणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. मात्र त्यातून चुकीच्या कृती होणे हे तर ते पाशवी वृत्तीचे लक्षण ठरते. कुणावर किती विश्वास ठेवायचा याचाही मुला-मुलींनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कुणासोबत मैत्री करायची आणि किती पातळीवर याचाही गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपले आई वडील हेच आपले जगातील एकमेव शुभचिंतक आहेत, हे मुला-मुलींनी ध्यानात घ्यावे. जगात सर्वात बेस्ट फ्रेंड आपले आईवडील आहेत याची पदोपदी जाणीव ठेवावी. त्यांना प्रत्येक गोष्टीत विश्वासात घेतले पाहिजे. आई-वडीलांना एक किंवा दोन अपत्ये असल्याने व त्यांनी चांगले करिअर निवडावे, यासाठी सर्वतोपरी लावण्याची त्यांची तयारी असते. आपल्याला जे मिळाले नाही, ते मुलांना मिळाले पाहिजे, असा पालकांचा अट्टाहास असतो. स्वतः ड्रायव्हरचे काम करूनही दर्शनाच्या वडीलाने तर इतर काम करून आईने लेकीला घडवले. लेकीनेही दहावी, बारावी, पदवी, एम.पी.एस.स्सी. टॉपर करीत वनविभागातील आर.एफ.ओ. पोस्ट मिळवली. लग्नास नकार न पचवू शकलेल्या राहुल हंडोरे ने केलेल्या हत्तेची त्याला शिक्षा तर होईलच.

        हल्ली बाहेर मैञीच्या नावाखाली अनेक मुलींची फसवणुक होते आहे. त्या अत्याचाराला बळी पडतात. आपला जीव गमावुन बसतात. मिञ-मैञिणी बरोबर बाहेर फिरायला जाणे, विविध व्यसने करणे, आजची भावनाशून्य मुले चैनीसाठी, स्वार्थासाठी आई-वडिलांचा सुद्धा वेळप्रसंगी विचार करीत नाहीत. त्यासाठी योग्य ते संस्कार, चांगले वातावरण त्यांना मिळणे आवश्यक आहे. शिवाय पालकांनी मुलांना वेळ देणे सर्वात महत्त्वाचे आहे. हाडाची काडे करून, वेळप्रसंगी उपशी राहुन आई-वडील आपल्याला पैसे पाठवतात. आपल्या आई-वडिलांची मुलांनी जाणीव ठेवायला पाहिजे. मुले इकडे काय करतात ते आई-वडिलांना कसे काय समजणार? ते बिचारे फक्त पैसे पाठवायचे काम करत असतात. या वयात शिकायचे सोडून नको ती धंदे कशाला मुलांनी करायचे .

        अशा घटना टाळण्यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना विश्वास पुर्ण वातावरण देण्याचा  प्रयत्न केला पाहिजे, त्यांना एकमेकांविषयी दया आणि न्याय्य वागणूक करायला आणि कुठलाही त्रास असल्यास बोलून, मोठ्यांना सांगून सोडवता येतो हे भान दिलं पाहिजे. जबरदस्ती किंवा बंधनाने अशा समस्या सुटणार नाहीत.  विद्यार्थ्यांना लाइफस्कील वर कार्यक्रम करण्यावर भर दिला पाहिजे. मुलींनी आई-वडीलांच्या सतत संपर्कात असले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे मनाला जे वाटते ते त्यांच्याशी शेअर केले पाहिजे. तसेच लग्न जमविताना आई-वडीलांनी मुला-मुलींना विश्वासात घेणे हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. प्रेमात लग्नास नकार मिळू शकतो, हे मुलाला किंवा मुलीला पचवण्याचे धारिष्ट्य बाळगावे लागेल. 


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय