तिची चूक काय होती?
तिची चूक काय होती?
दर्शना पवार नावाची साखर कारखान्यातील एका ड्रायव्हरची खेडेगावातील मुलगी. MPSC परिक्षेत राज्यात तिसरी येत "तिने रेंज फॉरेस्ट ऑफिसर" ची पोस्ट काढली. गावात सत्काराचे मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र तिला सत्काराला बोलावणं येवू लागलं. अशातच राहुल हंडोरे या ओळखीच्या तरुणाने ट्रेकिंग च्या बहाण्याने १२ जून रोजी राजगडाकडे दुचाकीवरून नेले. तिथेच घात झाला. प्राथमिक माहिती नुसार लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला केला. गुराख्यांना वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला मृतदेह आढळला. 'फादर्स डे' दिवशी तिच्या वडिलांना मृतदेह ओळखण्याचे दुर्दैवी काम करावे लागले. यात तिची चूक कोणती? जगात नसल्याने गेल्या सात-आठ दिवसांपासून अनेकांनी तिलाच आरोपीच्या कटघ-यात उभे केले. एक तर आरोपांना उत्तर द्यायला ती जिवंत नाही. अनेकांनी तर तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले, काहींनी तोंडसुख घेतले. ती तिथे का गेली? लग्नास नकार का दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर करण्यात आली.
वडील साखर कारखान्यात ड्रायव्हर असल्याने सुदैवाने तिचे शालेय शिक्षण कोपरगाव शहरातील शारदा इंग्लिश मेडीयम शाळेत झाले. मुळातच ती जिद्दी आणि चिकाटीची होती. लहानपणापासून तिला अभ्यासाची आवड होती. त्यामुळे शाळेत ती अव्वलस्थानी असायची. १७ ते १८ अभ्यास करण्याची तिची सवय. त्यामुळे यश प्रत्येक वेळी तिला गवसणी घालायचे. मेहनतीच्या बळावर दहावीत ९५ टक्के गुण संपादन केले. बारावीतही ९८ टक्के गुण मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. पदवी, पदव्युत्तर परिक्षेतही घवघवीत यश मिळवले. एम.पी.एस.स्सी. परिक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावत आर.एफ.ओ. ची पोस्ट हस्तगत केली.
दुर्दैवी अंताने तिचा शेवट झाला. पोलीस तपास करीत आहेत. सत्य बाहेर येईलच. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांच्या प्रयत्न सुद्धा राहील. मात्र गेल्या काही दिवसांत जिच्या हत्या झाली, तिलाच आरोपी करण्यात येत आहे. मनाला वाटेल ते काहीजण लिहीत आहेत. हत्या-याने कबूल केले की, लग्नास नकार दिल्याने हत्या केली. ही आरोपीने रचलेली स्टोरी असू शकते. कारण आरोपीने मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल असा रेल्वेने केलेला प्रवास, तीचा १२ जून लाच बंद केलेला मोबाईल, पोलिसांना लोकेशन ट्रेस होवू नये म्हणून त्याने वेळोवेळी बंद ठेवलेला मोबाईल. पोलीसांना आरोपीच्या नातेवाईकांचा मोबाईल घेऊन त्याला पैसे पाठवून त्याचे लोकेशन ट्रेस करावे लागणे. राजगडावर तो सशस्त्र गेला हे दर्शनाच्या अंगावरील 'वार' यावरून दिसून येते. म्हणजे आरोपीने हे सर्व ठरवून केलेले दिसते. काहींचा आक्षेप की, ट्रेकिंगला तीने जायलाच नको होते. काहींनी तर छपरी ठरवून टाकले. काही इलेक्ट्रॉनिक मिडियाने तर ती एम.पी.एस.स्सी. ची तयारी करीत होती, म्हणून तयारी करणाऱ्यांशी संवाद घडवून आणले. मित्र-मैत्रिण या महाविद्यालयात जिवनात घडणाऱ्या बाबी. या परीक्षेची तयारी करतायं हे म्हटले तर ते विचाराचे परिपक्व असतात. एवढा प्रचंड अभ्यासाचा आवाका आणि वयाचा अनुभव लक्षात घेता शरिराचे आकर्षण हा मुद्दा सुद्धा गौण ठरतो. राहीला तीच्या लग्नाचा विषय तर ती आणि तिच्या घरच्यांनी मिळून हा निर्णय घेतला असता.
तिच्यावर आलेला दुर्दैवी प्रसंग ती टाळू शकली नाही. मात्र तिच्यावर तोंडसुख घेणा-यांनी किमान यांचा तरी विचार करावा की, उत्तरं द्यायला ती जिवंत नाही. यानिमित्ताने काही मुद्दे समोर येतात. माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. पालक आणि मुलांमध्ये मनमोकळा संवाद असला पाहिजे. जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मुला-मुलींना दिले पाहिजे. मुलींचे मत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. तिनं ट्रेकींग ला जाणं, त्याच्या सोबत जाणं, लग्नाची मागणी घालणं हे सर्व चुकीचे वाटत नाही. मात्र त्याच एकतर्फी प्रेम हेच मुळात चुकीचे होते. 'माझी नाही तर कुणाचीच नाही ' ही राहूल ची धारणा चूकीची होती. त्यान तिचा जीव घेतला हे चूकीचे होते. तीने नकार देताच त्याच्यातील नराधम जागा झाला. त्याने तीचा जीव घेतला. ही त्याची चूक. त्यात दर्शनाचा काय गुन्हा? दर्शना चा खून झाला म्हणून हे प्रकरण पटलावर आलेले आहे. मात्र अशी कितीतरी प्रकरणं आहेत, ज्यावर पांघरूण पडलेले आहे. ही एक पोलीस केस म्हणून न पाहता, सामाजिक विषय म्हणून पाहणे संयुक्तीक ठरेल. म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकरछत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment