दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा

 दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा

        पैसा हाच उद्देश करिअरच्या बाबतीत नसावा तर आपल्या अंगी असलेले कौशल्य, ज्ञान याचाही महत्त्वाचा रोल ठरतो. त्या क्षेत्रातील आव्हाने काय आहेत, मर्यादा कोणत्या आहेत याचाही विचार करिअर निवडताना केला पाहिजे. नुकतेच दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. त्यात काहींना समाधानकारक गुण संपादन करता आले. तर काहींची अपेक्षापूर्ती झाली नाही. मुळात या गुणांवर आधारित कोणतेही कोर्सेस राहिले नाहीत, काही अपवाद सोडले तर. प्रत्येकाची एक वेगळी चाचणी परीक्षा आहे. त्यामुळे त्या वर्गात या चाचणीसाठी पात्र ठरु एवढे गुण असले तरी पुरेसे आहेत. प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न असते. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले पाहिजेत. त्यांची अपेक्षा पालक म्हणून रास्त आहे. आपल्याला जे मिळाले नाही, त्यापेक्षा अधिक लावण्याची पालकांची तयारी असते. मात्र सर्वांना ते शक्य नाही. त्यामुळे अजिबात निराश व्हायचे कारण नाही. डॉक्टर किंवा इंजिनिअर होवून जे करता येणार नाही, मिळवता येणार नाही, त्याही पेक्षा दर्जेदार आणि सामाजिक महत्त्व प्राप्त करून देणारे कोर्सेस उपलब्ध आहेत. 

         सर्वसामान्यपणे दहावी झाली की अकरावी कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेकडे बहुतांश जणांचा कल असतो. मात्र लगेच स्वतः च्या पायावर ज्यांना उभा राहायचे आहे, त्यांच्यासाठी अनेक व्यावसायिक कोर्सेसची संधी खुणावत आहे. दहावी नंतर आपण जो निर्णय घेतो, त्याचा संबंध भविष्यावर होतो. दहावीला बेस्ट फाईव्ह चे ऑप्शन असल्याने टक्केवारी चांगली आहे. जो अवघड विषय आहे, त्याला वगळून टक्केवारी असल्याने पर्सेंटेज जास्तच येते. त्यामुळे याचा फायदा घेण्याची संधी आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक चे विविध अभ्यासक्रम चांगली संधी उपलब्ध करून देत आहेत. आयटीआय मधील टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रेशिअन, बुक बाइंडर, मोल्डर, मशिनिष्ट, कम्प्युटर हार्डवेअर, रेफ्रिजरेशन अँड कुलींग, डीजल मेकॅनिक, रेडिओ अँड टेलिव्हिजन, कम्प्युटर ऑपरेटर अँन्ड प्रोग्रॅमींग, डिटिपी, CAD CAM, सर्व्हेअर यांसह विविध पर्याय आहेत. ज्यांच्या माध्यमातून एक ते तीन वर्षात आपल्या आवडीच्या क्षेत्रात सहज प्रचंड भरारी घेवू शकता. ज्यांना काही विषय अवघड वाटतात, पुढील शिक्षण घेणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आजूबाजूच्या वातावरणात असंख्य युवा आयटीआय च्या माध्यमातून चांगले पैसा कमावत आहे. कमी वयात चांगली सामाजिक प्रतिष्ठा त्यांनी कमावली आहे. पॉलिटेक्निक मध्ये करिअर करण्यासाठी अतिशय चांगले चांगले पर्याय उपलब्ध आहेत. साधारणपणे तीन वर्षाचे हे डिप्लोमा आहेत. मेकॅनिकल, टेक्सटाइल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल, कम्प्यूटर, ऑटोमोबाईल यांसह विविध पर्याय पॉलिटेक्निक मध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तिन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर ज्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे, ते डायरेक्ट अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेवू शकतात. त्यामुळे इन्ट्रान्स परिक्षेच्या जाचातूनही वाचू शकतो.

        अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध आहेत.DMLT सह विविध पॅरामेडिकल, DTP, Tally, Short Hand, Graphics सह विविध शॉर्ट टर्म कोर्सेस पर्याय आहेत. अकरावी कॉमर्स, सायन्स किंवा आर्टस असेही पर्याय आहेत. ज्यांना लवकरात लवकर पैसे कमावून चांगले भविष्य निवडावयाचे असेल त्यांच्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम दहावीतच उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्ञानार्जनासोबत अर्थार्जन होवू शकते.

डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय