बारावी नंतरचे करीअर
बारावीचे नंतर करीअर
शैक्षणिक जीवनात बारावीचे वर्ष आणि वय या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वपूर्ण ठरतात. करीअर निवडण्यासाठी हे योग्य वय आहे. तर शिक्षणाचा करिअर निवडण्याचा योग्य बेस हा बारावीच ठरतो. आयुष्यातील टर्निंग पॉइंट असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. बहुतांश पालकाचे स्वप्न असते की, पाल्याने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे. अतिशय चांगली संकल्पना आहे. मेडिकल, इंजिनिअरींग ला प्रवेश मिळत असेल तर चांगलेच. दोन्ही क्षेत्रात चांगले कोर्सेस आहेत, ज्या आधारावर विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याची नामी संधी मिळते.एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., एम.डी., एम.एस., असे विविध टप्प्यांवरील शिक्षण पूर्ण करीत डॉक्टर होता येते. इंजिनिअर मध्ये अनेक दर्जेदार स्वरूपाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी विविध पर्याय आहेत, त्याचाही विचार करायला काहीच हरकत नाही.
बी.एस्सी.ॲग्री हा सुद्धा एक पर्याय होवू शकतो. शेती किंवा शेती संलग्न क्षेत्रावर नाविण्यपूर्ण कामगिरी करण्याची संधी याद्वारे प्राप्त होते. लॉ मध्ये बी.एस.एल.लॉ हा बारावी नंतर पाच वर्षाचा पदवी कोर्स आहे. या क्षेत्रात नवनवीन आव्हाने आहेत. उदयोन्मुख आणि नाविण्यपूर्ण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता येतो. फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा डीग्री संपादन करून सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात झेप घेण्यासाठी फार्मसी हा एक चांगला पर्याय आहे. डी.एल.एड. करून शाळेत अध्यापनाची संधी आपणास खुणावत आहे. जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या शाळेत, तसेच खासगी अनुदानित शाळेत चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध होवू शकते. शिवाय अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चांगला पगार दिला जातो. पत्रकारिता या क्षेत्रात जर्नालिझम चा कोर्स करून आपला ठसा उमटवता येतो. वृत्तवाहिन्यात निवेदक, व्हिडीओग्राफर, रिपोर्टर होता येते. सोशल वर्कची आवड असणाऱ्यांसाठी बी.एस.डब्ल्यू. ही पदवी व पदव्युत्तर असा पर्याय आहे. हॉटेल व्यवस्थापन, टुरिझम यातही पदवी-पदव्यूत्तर पदवी घेऊन कौशल्य विकसित करण्याची संधी आहे. अँनिमेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, जगातील अनेक भाषा शिकून विदेशात नोकरीच्या संधी आहेत. बी.एस.स्सी नर्सिंग करून वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक मोठ्या रूग्णालयात चांगला पगार यासाठी मिळू शकतो. बी.टेक. हा चांगला पर्याय उपलब्ध आहे. विज्ञान शाखेसाठी NDA हा विकल्प आहे. मर्चंट नेव्ही, एव्हिएशन, फॉरेंसिक सायन्स, होमसायन्स, पॅथोलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, रोबोटिक सायन्स, अस्ट्रो फिजिक्स सह विविध पर्याय उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेसाठी सी.ए., सी.एस., आय.सी.डब्ल्यू.ए., जीडीसी अँड ए., सारखे कोर्सेस निवडत लेखा क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध आहे. बँकिंग अँड इन्शुरन्स, बी.बी.ए., बी.एम.एस., असेही पर्याय वाणिज्य शाखेतील उमेदवारांना आहेत.
कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट करता येते. बी.एड, बी.पी.एड. लॉ, चे कोर्सेस आहेत. पदवीधरांना एम.पी.एस.स्सी., यु.पी.एस.स्सी. सह विविध स्पर्धा परीक्षांचे पर्याय उपलब्ध आहेत. नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सहायक प्राध्यापक होता येते. बारावी, पदवी नंतर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. जवळपास सर्वांना एन्ट्रान्स परीक्षा आहेत. कोणी सांगतंय म्हणून तो कोर्स करू नका. करीअर आपल्याला करायचे आहे, त्यांना नाही. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती याकामी येतात. हॉस्टेल साठी सुद्धा शिष्यवृत्ती मिळते. हॉस्टेल ला नंबर लागला नाही तरी सरकार वसतिगृह भत्ता देते. अनेक विद्यापीठात 'कमवा आणि शिका' योजना आहेत. ठराविक तास काम करून किमान मेसचा खर्च भागवता येतो. शिक्षण हे खरोखरच आपणास स्वतः च्या पायावर उभे करण्यात मदत करते. वरील पर्यायांसोबत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. सारासार विचार करता विवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य पर्याय निवडून उज्वल भवितव्य निवडा. पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकरछत्रपती संभाजीनगर

Comments
Post a Comment