शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले

शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले

        पुणे हे शिक्षणाचे माहेरघर. ती राज्याची सांस्कृतिक राजधानी. मात्र तेथील गुन्हेगारीच्या काही वाढत्या घटना पाहता पालकांच्या चिंतेत भर पडत आहे.  दर्शना पवार हत्या प्रकरणाचे घाव ताजे असतानाच आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी सकाळी ०९.५५ च्या सुमारास सदाशिव पेठेत शंतनू जाधव या आरोपीने एकतर्फी प्रेमातून मुलीवर प्राणघातक हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या त्याने हे दु:साहस करण्याचा प्रयत्न केला. जिवाच्या आकांताने ती तरूणी वाचवा वाचवा म्हणून ओरडत पळत होती. सुरूवातीला एका गणेश मंडळाच्या सहका-यांनी हल्ल्यातून तिला एकदा वाचवले. मात्र ती मुलगी पुन्हा पळाली, त्या मागोमाग आरोपीने कोयता हातात घेऊन पाठलाग केला, मात्र लोकांनी बघ्याची भुमिकाच स्विकारणे पसंत केले. अशावेळी एम.पी.एस.स्सी. चा अभ्यास करणा-या दोन जिगरबाज तरूणांनी कोणत्याही होणा-या परिणामांची चिंता न करता तिच्यावर होणारा फार मोठा अनर्थ टाळला. रस्त्यावर आडवी पडलेल्या तरूणीवर आरोपी कोयत्याचा वार करणार तोच तरुणाने त्याला अडवले, तर दुस-याने त्याच्या हातातील कोयता हिसकावून घेतला. समाजात अजूनही माणूसकी जिवंत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. यातील लेशपाल जवळगे या एका तरुणाच्या हाताला सुद्धा कोयत्याने जखम झाली आहे. लेशपालने प्रसंगावधान दाखवत वरचेवर कोयता झेलला. तर हर्षल पाटील ने तो कोयता काढून घेतला. या दोन्ही तरूणांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        एकतर्फी प्रेमातून घडलेला प्रकार आहे. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार हा आरोपी तरुण पीडीत मुलीला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत होता. मुलीला तुझ्या सोबत मैत्री करायची नाही असे सांगून सुद्धा त्याने तिला फोन वरून धमकी दिली होती. आरोपीच्या घरी हा सर्व प्रकार सांगितला असता रागाच्या भरात त्याने मुलीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीला डोक्यावर टाके पडले असून हातावर सुद्धा जखमा झाल्या आहेत. योगायोग म्हणजे कोयत्याला धार नसल्याने मोठी हानी टळली. आरोपीला पकडले असता जमावाने चांगला चोप देऊन पेसगेट पोलिस स्टेशन चौकीमध्ये पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. मुलीवर ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

        'एवढी क्रुरता कुठून अंगात येते? स्वतः चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी असे भ्याड हल्ले करतात हे मुलीवर. पुण्यात राहताना या आधी कधीच भिती वाटली नाही, आता मात्र काळजी वाटतेय,' असे उद्गार पुण्यातील मुलींच्या तोंडून येत आहेत. 'पुस्तक घेऊन दिसणारी मूलं पाहिली की भावी अधिकारी दिसायचे, मात्र आता वातावरण खराब होत आहे' अशी बोलकी प्रतिक्रिया वाचावयास मिळाली.

        खरोखरच या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, मुळात यांना कायद्याचा धाक वाटत नसावा का? पुण्यासारख्या शांत आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वैभवशाली शहरात गेल्या काही घटना पाहता याला जबाबदार कोण? एम.पी.एस.स्सी. करणारे जवळपास पन्नास हजारांहून अधिक युवक -युवती हे सदाशिव पेठ, नवी पेठेत राहतात. पुण्यात एम.पी.एस.स्सी. करणारे एकूण एक लाखाच्या आसपास परिक्षार्थी तयारी करतात. महाराष्ट्रात हा आकडा तिस लाखाच्या घरात आहे. मुलांवर योग्य संस्कार करणं काळाची गरज आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी मुलांना ठेवणा-या पालकांच्या चिंतेत वाढ करणारा विषय आहे. नकार पचवण्याची क्षमता असावी. फिल्मी डायलॉग सारखे "मेरी नही तो किसी ओर की भी नहीं' हे फक्त सिनेमात बघायला चांगले वाटते. वास्तवात त्याचे चटके त्याच्या आणि तिच्यासह दोन्ही कुटुंबांना होरपाळतात. त्यामुळे कोणताही गोष्ट करताना दहा वेळा आपल्या आई-वडिलांचा विचार केला तर अशा घटना टाळता येतील. मुलींना प्रशिक्षण देऊन आत्म संरक्षण धडे दिले पाहिजेत.

डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय