व्यसन 📱 मोबाईलचे

 व्यसन 📱 मोबाईलचे 

        पुर्वी मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. त्यात मोबाईल ही चौथी गरज आजच्या काळात वाढली. मोबाईल मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. कारण जवळ मोबाईल नसला की काही तरी हरवल्या सारखे अनेकांना वाटते. मोबाईलचा वापर सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत होता. सकाळी गुडमॉर्निंग पासून याची सुरुवात होते. दुध वाल्याला उशीर झाला तर त्याला 🤙 कॉल केला जातो. दाढी-कटींग करायची असेल तर नाव्ह्याकडे किती नंबर आहेत, याची चाचपणी केली जाते. किराणा मालाचे पैसे फोन- पे वरून अदा केले जातात. घरी कोणी आजारी असेल तर डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी त्याचा वापर होतो. नविन माहिती त्याद्वारे मिळते. सणावारांच्या शुभेच्छा याद्वारे दिल्या जातात. मनोरंजनाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. लहानग्यांच्या अंगाई पासून ते वयस्करांचे आवडते किर्तन-भजन ऐकता येते. तरूणाईची आवड असलेले सिनेमे, गाणे ऐकता येते. प्रवास करायचा असेल आणि रस्ता माहित नसेल तर गुगल मॅप द्वारे सहज तेथे पोहोचता येते. अभ्यास करताना सुद्धा तो उपयोगी पडतो. लॉकडाउन काळातील दोन वर्षात तर शाळा-महाविद्यालयाची जागा त्याने घेतली. गुगल मिट सारख्या तंत्राद्वारे समुहाला विशिष्ट वेळी शिकता व शिकवता आले. स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा ते उपयोगी पडले. युट्यूबवरील व्हिडिओंनी अभ्यासात मदत केली.  गुगल सर्च ने शिक्षकांची उत्कृष्ट भुमिका निभावली. बँकिंग विश्वातील व्यवहार आपण त्यांच्या सहाय्याने करु लागलो. सातासमुद्रापार व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून समोरासमोर उभे असल्या सारखा संवाद होवू लागला. जिथे पोस्टाने पत्रव्यवहार, मनिऑर्डर करायला काही दिवसांचा अवधी लागत होता, तेथे ई-मेल,फोन-पे क्षणाचाही विलंब न लावता ती कामे होवू लागली. शेतातील पाण्याचा पंप मोबाईलशी कनेक्ट झाला.तो ऑन-ऑफ मोबाईल करू लागला. मानवी जीवनातील ही महत्वपूर्ण उत्क्रांती म्हणावी लागेल. मात्र आपण ते साधन हाताळतोय की ते आपल्याला हे शोधण्यात गफलत होवू लागली. चांगले काय आणि वाईट काय याचा मेळ लागत नव्हता. चांगलेपणा सोबत त्याच्यातील उणीवा मानवाला घातक ठरत आहेत.

        १४० कोटी भारतीयांपैकी १०० कोटींहून अधिक जणांकडे मोबाईल हे साधन आहे. 'कर लो दुनिया मुठ्ठी में' चार भडीमार जनतेवर जाणवत आहे. अगदी एक हजार रूपयांपासून ते काही लाखांच्या घरात त्याच्या किंमती आहेत‌ चिन सारख्या देशाने दोन हजाराच्या आत अँड्रॉइड फोन चा पुरवठा करून धमकाच घडवून आणला. त्यामुळे महाला पासून ते झोपडी पर्यंत, लहानणापासूनच ते थोरापर्यंत, गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत, कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत अशा समाजातील सर्वच घटकांकडे त्याचा सहवास जाणवत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, स्नॅपचॅट सारख्या समाज माध्यमातून सहज व्यक्त होता येते. व्हाट्सअप चे मेसेजेस आणि व्हिडिओ क्षणार्धात इकडून तिकडे प्रवास करतात. खरे काय आणि खोटे काय हे पाहायला कोणाला वेळ आहे. रील्स, शॉर्ट व्हिडिओ 📸, याने तर कहरच केला आहे. अनेकांचे तासनतास त्यात सहज जातात. यातील चांगल्या गोष्टीचा फायदा घेण्याऐवजी मोबाईलच्या अतिरेकी वापराने दुष्परिणाम जास्त आढळतात.

        दुचाकी किंवा चारचाकी वरून प्रवास करताना मोबाईल उचलणे अपघातास निमंत्रण देते. फारच महत्त्वाचा 🤙 कॉल असेल तर गाडी रस्त्याच्या बाजूला घेवून बोलणे सोईस्कर ठरते. यावेळी कानात 🎧 हेड फोन असू नये. रस्ता किंवा 🚂 रेल्वे पटरी ओलांडताना चुकूनही हेडफोन वापरू नये. काहीजण तासनतास मोबाईलवर पडिक असतात. अगदी कमी पैशात दीड किंवा दोन जीबी डेटा वापरण्याची विदेशी कंपन्यांनी सवय लावलेली आहे. बेरोजगार तरुण हा डेटा कसा संपवावा याच्याच बेतात असतात. ऑफिसला जाताना मोबाईल घरी विसरला म्हणून तो आणायला आपण अर्ध्या रस्त्यातूनही घरी परत जातो. खरे पाहता त्यादिवशी आपण विना मोबाईल सहज राहू शकतो. काहींना मोबाईलची इतकी सवय जडली आहे की दर पाच मिनिटाला ते व्हाट्सअप फेसबुक सहइतरत्र फिरून येतात. जणू हा आजार जडला आहे. मोबाईलच्या सतत वापराने चिडचिडेपणा, एकटेपणा, डोकेदुखी यासारखे अनेक आजार दिसून येत आहेत. त्यातून अनेक जण डिप्रेशनमध्ये जात आहेत, ही फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. गल्लीबोळा दिसणारे महाकाय मोबाईलचे 🗼 टॉवर प्रगतीचे लक्षण वाटत असेल तरी मानवी जीवनास ते हानिकारक ठरते. त्यातील विद्युत चुंबकीय लहरी शरीरातील तरंग पेशींची हानी करतात. मोबाईलच्या अतिरेकी वापराने लहान मुलांची एकाग्रता कमी होत आहे. आजकाल तर सात आठ महिन्याच्या बाळाला मनोरंजनासाठी मोबाईल दिला जातो. त्याला दिसेल अशा ठिकाणी मोबाईल चालू ठेवून त्यात कार्टून किंवा गाणे लावून त्याची आई घरकाम उरकण्याचे काम करते. त्यामुळे त्याला लहाणग्याला मोबाईलची सवय लागते. काही घरात तर त्या लहानग्याचे जेवण मोबाईल चालू असेल तरच होते अन्यथा ते बाळ जीवन सुद्धा नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलाला सांभाळायला कोणी नाही. त्याला मोबाईल चालू करून दिला की दोन- तीन तास कसे निघून जातात हे आईला कळत नाही. आजकालची मुलं मोबाईलवर मोठ्या प्रमाणात गेम खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांना 'अल्झायमर' सारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्याच्या अतिरेकी वापरामुळे अनेक लहानग्यांची दृष्टी अधू झालेली आहे. नर्सरी-बालवाडी पासून मोठ्या भिंगांची चष्मे त्यांना वापरावे लागतात. मोबाईलच्या अतिवापराने स्त्री-पुरुषांच्या गुणसूत्रावर परिणाम होऊन नपुसंकत्व आल्याची उदाहरणे पहावयास सापडतात. सायबर क्राईम वाल्यांनी अनेकांचा पासवर्ड हॅक करून बँकांची खाते रिकामी केल्याचे आढळले आहे. काही सायबर क्राईमवाले ठराविक लिंक पाठवा पाठवल्या जातात, त्या लिंक वर क्लिक केले असता आपला सगळा डेटा त्यांना प्राप्त होतो. अगदी आधार नंबर,  पॅन नंबर,  बँक डिटेल्स त्यांना सहज प्राप्त होतात, ज्याचा ते गैरवापर करू शकतात. पर्सनल डेटा यातून लिक होऊ शकतो. काहींना मोबाईलवर सेल्फी घेऊन ती अपलोड करण्याचा छंद असतो, यातून अनेक गैरप्रकार झाल्याचे दिसून आलेले आहे. कॅन्सरला कारणीभूत ठरणारी धोकादायक किरणे कॅन्सर व्हायला कारणीभूत ठरतात. मोबाईल मधून बाहेर पडणारे रेडिएशन हे सुद्धा धोकादायक ठरू शकतात. झोपताना अंधुक प्रकाशात मोबाईल पाहिला असता दृष्टीदोष उदभवतो. जास्त वेळ त्यात गुंतून राहिल्यास वेळेचे भान राहिले नाही तर डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. 

        काही व्यक्ती मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत. मोबाईलची बॅटरी संपत आली की त्यांना काळजी वाटू लागते. कधी कधी लाईट गेल्यामुळे फोन चार्ज नसेल तर त्यांना काहीतरी हरवल्यासारखे वाटते. फोनची रिंग वाजली नाही तरी त्यांना रिंग वाजल्याचा भास होतो. काही अपवादात्मक प्रसंगी (दंगलसदृश परिस्थिती) नेटवर्क बंद ठेवल्या जाते. अशावेळी ज्यांना हे पाच ते सहा दिवस वर्षभरासारखे वाटू लागतात अशा आजाराला 'नामोफोबिया' म्हणजे नो मोबाईल फोबिया म्हणजेच फोन जवळ नसल्यावर अस्वस्थता वाटू लागणे, बेचैनी वाढणे हे गंभीरतेचे लक्षण जाणवते. हा मानसिक आजार असून पाश्चात्य देशात या आजाराचे प्रमाण प्रचंड आहे. आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचे लोन पसरत चालले आहे. काहींना तर पावर बॅंक सोबत ठेवावी लागते. व्यावसायिकांचे ठीक आहे. मात्र गरज नसताना पावर बॅंक, चार्जर, हेडफोन, ब्ल्यू टूथ सोबत ठेवण्याची खरोखरच गरज आहे का? एका सर्वेनुसार मोबाईलचा वापर 15 ते 20 वयोगटातील युवक जवळपास पंधरा तासाच्या आसपास करीत आहेत. हे मेंदूसाठी घातक आहे. ज्यात 'हाय फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक फिल्ड' हा मेंदू व रक्तासाठी घातक ठरतो. तरुण-तरुणीचा मोबाईलचा जास्तीचा वापर ते कुटुंबापासून दूर जाण्यात होतो. त्यातून अनेक अनर्थ घडलेले आहेत. व्हिडिओ मार्फिंग द्वारे तरुणीचे अश्लील फोटो सार्वजनिक केल्याच्या घटनांत वाढ होत आहे. मोबाईलच्या अतिवापराने पाठीच्या कण्यावर ताण पडून त्यातून पाठीच्या कण्याचे विकार अनेकांना जडत आहेत. 

            हे टाळायचे असेल तर वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चांगल्या सवयी लागतील. विचार करण्याची क्षमता वाढेल. मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आवडीच्या खेळाची ऍक्टिव्हिटी लावणे आवश्यक आहे. त्यातून त्याची शरीरयष्टी मजबूत होऊन भरपूर भूकही वाढेल. ते करता येत नसेल तर डान्स, गायन किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा क्लास लावावा जेणेकरून त्याला आपले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध होईल. मुलांना 24 तासांपैकी किमान दोन तास, शक्य नसल्यास एक तास तरी मैदानावर सांघिक खेळ खेळायला पाठवणे आवश्यक आहे. ज्याद्वारे त्यांची समूहाशी बोलणे, वागणे, व्यवहार कौशल्य त्याला आत्मसात करता येईल. अनावश्यक ॲप डाऊनलोड करू नयेत. शक्यतो गेम्स असूच नयेत किंवा असलेच तर एक किंवा दुसरा असावा. रात्री झोपताना मोबाईल लांब ठेवावा, बंद ठेवला तर अति उत्तमच. मेसेजेस पाहण्यासाठी फक्त ठराविक वेळ मनाशी ठरवून घ्यावी. आपल्याला मोबाईल साक्षर होणे काळाची गरज आहे. त्याचा मर्यादित वापर आपल्या हिताचा आहे. हेडफोन ऐवजी स्पीकर ऑन करून थोडक्यात बोलायचे शिकलो तर बहिरेपणाचा आजार सहजपणे टाळता येईल. डोळ्यांना व हाताला सहजपणे वापरता यावा यासाठी 'ग्लोरीला ग्लास' स्क्रीन वरती लावणे आवश्यक आहे. त्याचा प्रमाणात वापर हिताचा आहे.



डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय