समृध्दी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

 समृध्दी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

        आजची सकाळ अत्यंत दु:खद आणि मनाला चटका लावणा-या बातमीने झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुंटा येथे समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा दुर्दैवी अपघात होवून बस जळून खाक होत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांचा सिंदखेडराजा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात असल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख तर पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये मदतीची घोषणा केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनाही मदत घोषित करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्दैवी घटनेत अपघाताने मरण्यापेक्षा होरपळून मृत्यु हे वेदनादायी आहे. चार दिवस मिडिया आणि वर्तमान पत्रात चर्चा होईल, मात्र यावर दीर्घकालीन उपाययोजना महत्वाच्या आहेत.

         मुंबई-नागपुर द्रुतगती मार्ग ७०१ किमी लांबीचा आणि सहापदरी महामार्ग आहे. त्याला 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखल्या जाते. ३९० खेड्याजवळून आणि दहा जिल्ह्यांच्या हद्दीतून हा रस्ता मार्गक्रमण करतो. पूर्वी नागपूरहून मुंबईला प्रवासासाठी १६ तास लागत होते. या महामार्गामुळे हे अंतर आठ तासांवर आले. याची प्रस्थावित किंमत ५५००० कोटी रुपये इतकी असून भुसंपादनाकरीता शासकीय दरापेक्षा पाचपटीने रक्कमा दिलेल्या आहेत. हा सरकारचा 'ड्रिम' प्रोजेक्ट आहे. वास्तविक रस्त्यांशिवाय विकास अधूरा आहे. राज्यात झालेल्या राष्ट्रीय महामार्गाने विकासात योगदान वाढवले. हा तर सर्वस्वी राज्याचा प्रोजेक्ट. रस्त्याची उंची मोठी आहे. रस्ता सरळ असून कुठलाही अडथळा नाही. साधं वळणं सुद्धा नसल्याने, खूप मोकळा रस्ता असल्याने ब्रेक लावण्याची आवश्यकता नाही. गेअर बदलण्याचा प्रश्न नाही किंवा स्टेअरिंगला सुद्धा हलविण्याची गरज पडत नाही. 

        मात्र या सुविधांमूळे वाहनांचा वेग वाढलेला आहे. यावरून प्रवास करणारे लोक अभिमानाने सांगतात की, आमच्या गावापासून शिर्डी ला इतक्या कमी वेळात पोहोचलो. हे जरी अभिमानास्पद असले तरी काही उणीवा निश्चित आहेत. हा सिमेंटचा रस्ता असल्याने टायर सुस्थितीत नसेल तर टायर फुटण्याचा जास्त धोका आहे. शासनाने तशा 🚆 गाड्या यावर चढवू नयेत, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. या रस्त्यावर चढायच्या ठिकाणी टायर ची तपासणी सुद्धा केली जाते. वाहनाचे टायर सुस्थितीत नसेल तर वाहनांना यावर चढू दिले जात नाही. मात्र कित्येक लोक याकडे दुर्लक्ष करून टायर चांगले आहे हे सांगत रस्त्यावर चढण्याचा अट्टाहास सोडत नाहीत.

        दि.१ जूलै २०२३ च्या मध्यरात्री १.३० च्या सुमारास एसी स्लिपर असलेली खाजगी 'विदर्भ' ट्रॅव्हल्सचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला. ती बस डिव्हायडर वर धडकली. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर ७ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही अक्षरशः 💓 हृदय पिटाळून टाकणारी घटना आहे.  🚆 ने पेट घेतल्यानंतर जिवाच्या आकांताने आतील लोक काचा फोडण्याच्या प्रयत्नात प्रयत्न करीत होते. त्यांच्या आजूबाजूने अनेक वाहने सुसाट वेगाने पुढे जात होती. कदाचित तात्काळ काही वाहने थांबून त्यांनी काचा फोडल्या असत्या तर मृत्यूचा आकडा कमी झाला असता. नंतर वाहने थांबली देखील मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बसच्या मागील बाजूस एक महिला आपल्या बाळासह काचेवर ✋ हात आपटतं होती. मात्र आपल्या डोळ्यादेखत त्यांचा जळून कोळसा झाल्याचे एकाने सांगितले. पुणे जिल्ह्यातील गंगावणे दांम्पत्य लॉ अभ्यासक्रमाला मुलाच्या प्रवेशाकरीता  नागपूर येथे गेले होते, मुलाला तेथे सोडून परतीचा प्रवास करीत असताना या दूर्दैवी प्रसंगात आपल्या मुलीसह तिघेही 🔥 आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. 🔥 आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने प्रवाशांची ओळख सुद्धा पटत नाही. अक्षरशः कोळसा झालेल्या अवस्थेत आहेत. हे मृतदेह बुलढाणा शवागारात ठेवलेले आहेत. जळाल्याने त्यांची ओळख पटते कठिण झाले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मृतांचे डीएनए करून त्यांची ओळख पटवली जाईल. 

        उद्घाटना पासूनच या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. अनेक जणांनी आपले प्राण अपघातात गमावले आहेत. वेगावर नियंत्रण अत्यावश्यक आहे. राज्यात सुरु असलेल्या धोकादायक आणि अनिर्बंध वाहतुकीवर शासन नियंत्रण कधी आणणार? समृद्धी महामार्गावर इतके अपघात होतात, याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न का होत नाही? सदोष निर्मितीमूळे आणि मानवी त्रुटींमुळे सतत होणारे या महामार्गावरील अपघात कधी थांबणार? फक्त शासनाला दोष न देता प्रवाशांनी सुद्धा स्वतः हून काही बंधने स्वतः वर लादून घेणे आवश्यक आहे.


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय