टी.आर.पी. चा बागूलबुवा
टी.आर.पी. चा बागूलबुवा
टीव्ही सिरीयल्स न्यूज चॅनल पहाणा-यांना टी.आर.पी. हा परवलीचा शब्द बनला आहे. तो त्यांच्या वारंवार 👂 कानावर पडतो. आपण टीव्ही वरील मालिका, चित्रपट किंवा बातम्या पाहताना मनात विचार येतो की, टीव्हीवाल्यांची कमाई किती आणि ती कोणत्या पद्धतीने होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मधून मिळतील.
टी.आर.पी. चा अर्थ:-
इंग्रजीतील TRP:- Television rating point हा फुलफॉर्म आहे.टीव्हीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व चैनल पैकी जो चॅनल किंवा शो जास्त वेळा बघितला जातो त्यास टीआरपी म्हणतात. टीआरपी म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी होय. हे एक उपकरण आहे.याच्या सहाय्याने कोणत्याही टी.व्ही. चॅनल पाहणारांची संख्या गणली जाते. यामुळे त्या चॅनेल ची लोकप्रियता किती आहे हे कळू शकते. ज्या चॅनलला जास्त टी.आर.पी. त्याला प्रेक्षक अधिक संख्येने पाहत आहेत, अशी प्रचिती येते. टी.आर.पी. ची माहिती जाहिरात एजन्सी करीता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ज्या चॅनेल वर जास्त टी.आर.पी.त्यालाच जाहिरातदार आपल्या जाहिराती देतात. सध्याचे युग हे जाहिरातीचे युग आहे. अनेक लोकं आपल्याला हवे ते प्रॉडक्ट जाहिरातीच्या माध्यमातून निवडतात. ठराविक वेळेनंतर टी.व्ही. चॅनेलवरील कार्यक्रमात जाहिरातीचा वारंवार भडीमार करतात. एखादी गोष्ट चांगली किंवा कशी हे स्वतः हून न ठरवता, नजरेसमोर होणा-या भडीमारातून ठरवतात. एखादे खोटं बोलणे दहा-पंधरा वेळा ऐकले तर ते खरं वाटू लागतं. तद्वतच प्रॉडक्ट चांगला किंवा कसा हे पाहण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. यातून त्याचा खप वाढतो.
टी.आर.पी. का काढला जातो:-
टी.आर.पी. काढण्याचे मुख्य कारण हे एखादी चॅनल किंवा शो ची प्रसिद्धी चेक करणे असते. त्याची लोकप्रियता किती हे दर्शवण्याचे साधन आहे. अनेक जाहिरातदार आपले प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी कोणता चॅनल चांगला आहे व सगळ्यात जास्त चॅनल कोणी पाहिला ही पाहूनच जाहिराती त्या चॅनेलवर देत असतात. त्यासाठी जाहिरातदार टीआरपीची मदत घेत असतात. त्यामुळे टीआरपी काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. टीव्ही पाहत असताना दोन किंवा ठराविक मिनिटे जाहिरात येते, या जाहिरातीतून टीव्ही चॅनल 80 टक्के कमाई करीत असतो. ज्या चॅनलचा टीआरपी रेट सर्वात जास्त त्या चॅनलची कमाई सर्वात जास्त असते.
टी.आर.पी. कसा मोजला जातो:-
ही मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली फ्रिक्वेन्सी मॉनिटरिंग ही पहिली पद्धत आहे. यात लोकांच्या 🏡 घरात लोक मिटर बसवण्याचा पहिला मार्ग आहे. याचा उपयोग प्रत्येक घराच्या तसेच आवारात पाहिल्या गेलेल्या टीव्हीच्या सर्वेक्षणात केला जातो. हे गॅझेट कुटुंबातील सदस्यांनी किंवा निवडलेल्या लोकांनी पाहिलेले चॅनेल किंवा कार्यक्रमाबद्दल डेटा रेकॉर्ड करतात. हे मीटर टीव्ही चॅनेलद्वारे किंवा एक मिनिटाच्या प्रोग्राम माहितीच्या माध्यमातून एक मॉनिटरिंग टीम वापरते. यावरून भारतीय प्रेक्षक विचारात घेतले जातात. ज्याद्वारे लोकांना कार्यक्रम आणि टीव्हीची टीआरपी मानली जाते. दुसऱ्या पद्धतीला पिक्चर मॅचींग तंत्र असे म्हणतात. जिथे लोक टीव्हीवर दिसत असलेल्या चित्राचा एक छोटासा भाग रेकॉर्ड करतात. हा डेटा चित्राच्या रूपात घरांच्या संचामधून गोळा केला जातो. नंतर टीआरपी ची गणना करण्यासाठी विश्लेषित केला जातो. बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) इंडिया एक पारदर्शक अचूक आणि सर्वसमावेशक टीवी प्रेक्षक मापन प्रणाली आहे.बीएआरसी कडून कार्यक्रमांना दिल्या जाणाऱ्या रेटिंग या अधिकृत मानल्या जातात.
टी.व्ही.वरिल कार्यक्रम टीआरपी च्या तालावर नाचतात:-
प्रेक्षकांची क्रयशक्ती कशी यावरून जाहिरातदार आपला प्रॉडक्टचा निर्णय घेतात. ज्या कार्यक्रमाला जास्त टीआरपी त्याला जास्त जाहिराती मिळतात. व वाहिनी साठी हे फायदेशीर सुत्र ठरते. मुलांसाठीच्या वस्तू किड्स चॅनल कडे वळतात. सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू ही सासू-सुनेच्या कथानक असलेल्या कार्यक्रमाकडे झुकतात. फॅशन किंवा गुन्हेगारी कार्यक्रम युवकांना भावतात, तर पौराणिक आणि अध्यात्मिक बाबी सीनिअर सिटीझन्स ला आवडतात.
घसरलेल्या टीआरपीचे परिणाम:-
ज्या कार्यक्रमांना प्रेक्षकवर्ग मिळत नाही, दुर्दैवाने तो कार्यक्रम बंद करावा लागतो. कारण तो कार्यक्रम निर्मितीचा खर्च कसा भरून काढायचा असा प्रश्न निर्मात्यासमोर असतो. म्हणजे जाहिरात हा एकमेव स्त्रोत सर्व खर्च भागवण्याचा असतो. आणि चैनल वरील अनेक चांगल्या चांगल्या मालिका टीआरपी कमी असल्यामुळे बंद झाल्याचे आपण अनुभवले आहे. 'सावित्रीजोती' ही क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे जीवनपट उलगडून दाखवणारी व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे मार्गदर्शक जीवनक्रम दर्शवणारी अतिशय दर्जेदार आणि वैचारिक माहिती देणारी मालिका रेटिंग अभावी बंद करावी लागली. रेटिंग कमी असल्यामुळे जाहिरातदारांनी काढता पाय घेतला, पर्यायी निर्मात्याला उत्कृष्ट कथानक नाईलाजाने बंद करावे लागले. लोकमान्य टिळकांचे देशाच्या स्वातंत्र्यातील योगदान निश्चितच स्पृहणीय आहे. मात्र टीआरपी कमी असण्याचा फटका 'लोकमान्य' ह्या टिळकांचे कर्तृत्व दाखवणारा कार्यक्रम निर्मात्याने बंद केला.
टीआरपी विषयी निर्माते:-
रेटिंग चांगला असेल तर भरपूर जाहिरातदार येतात आणि कार्यक्रमातून प्रचंड पैसा मिळतो. अगदी लॉकडाऊन मध्ये सुद्धा दूरदर्शनवरील 'श्रीकृष्ण' मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळाली होती. याच दरम्यान स्टार प्लस वरील 'महाभारत' या कार्यक्रमाला चांगल्या दर्जाची रेटिंग होती. देशात सध्या 850 हून अधिक टीव्ही चॅनेल आहेत आणि दरवर्षी त्यात वाढच होत आहे. न्यूज चॅनेल पाहत असताना रिपोर्टर आणखी पुढे, आणखी पुढे, अगदी जीवाला धोका असला तरी वार्तांकन करण्याचा प्रयत्न हा टीआरपीचाच महाप्रताप आहे. मात्र टीआरपी घसरत असेल तर निर्माते तो कार्यक्रम चालू ठेवण्याची तसदी घेत नाहीत. ऐतिहासिक व्यक्तिरेखा वरील मालिकांच्या भागांची संख्या मर्यादित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच ठरलेल्या भागांचा करार करून त्यानुसार लिखाण आणि संशोधन त्यांना करता येते. रेटिंगच्या कारणास्तव मालिका बंद झाल्यामुळे महान व्यक्तींचा संपूर्ण जीवनपट दाखवता येत नाही. हा प्रेक्षकांवर सुद्धा अन्याय केल्यासारखा आहे. प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून वेळ आधी मालिका संपवावी लागते. निर्माते त्यांच्या परीने चांगले प्रयत्न करत असतात. कार्यक्रमाचा दर्जा उत्तम ठेवणे, प्रचंड ताकदीचे कलाकार हजर करून त्यांच्या कलाकृती सादर करणे, मालिकासाठी जाणकार, तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं आणि ते त्या कार्यक्रमाची विश्वासार्हता टिकवण्याचा प्रयत्न ठेवतात. मात्र दर्जेदार कार्यक्रमाकडे प्रेक्षक वळत नसतील तर निर्मात्यांकडून चांगल्या कलाकृतीची अपेक्षा कशी ठेवायची? जनतेला जर धांगडधिंगा आवडत असेल तर त्यांनाही तशाच निर्मितीकडे वळावे लागते. हा टीआरपीच्या बागुलबुवा कसा वाचवायचा हे प्रेक्षकांची पसंती-नापसंतीवरच अवलंबून आहे.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment