अधिक मासाचे दैवत 'भगवान पुरूषोत्तम'

 अधिक मासाचे दैवत 'भगवान पुरूषोत्तम'

        ज्या चांद्रमहिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करीत नाही. तो अधिक महिना असतो. पृथ्वीभोवती 🌙 चंद्राची एक फेरी म्हणजे चांद्रमास. एक वर्षाच्या काळात बारा चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष असे म्हणतात. चांद्रमास हा प्रतिपदा ते अमावस्या असा २९.५ दिवसांचा असतो, त्यामूळे चांद्रवर्ष हे ३५४ दिवसांचे होते. पृथ्वीची सुर्याभोवतीची एक फेरी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४३ सेकंदात पूर्ण होते. म्हणजेच चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक वाढत जावून ३३ दिवसांचा निघतो. तोच अधिक मास असतो. ठराविक सण ठरावीक ॠतूत यावे हा मूळ उद्देश असतो. परंतु ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून आपल्याकडील कालमापनात चांद्र व सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. 366 तिथींचे एक चांद्रवर्ष होते. एका सौर वर्षाच्या काळात तशा सुमारे 371 तिथी होतात. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा 11 तिथीने लहान असते. दरवर्षी अकरा तिथी याप्रमाणे 33 तिथी झाल्या की अधिकमास येतो. तीन वर्षात होणारा 33 दिवसांचा फरक क्षयमास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते. सर्वसाधारणपणे चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंत कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित प्रसंगी कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येऊ शकतो. 

         अधिक मासालाच मलमास , धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, संसर्प मास, खरमास असेही म्हणतात. मलमास (मलिन मास) म्हणजे या महिन्याची अपवित्रता या नावातून दिसते. पूर्वी अपरिचित असलेल्या लहान मुलांना दगड्या, धोंड्या नावानं हाक मारत. तद्वतच या अशुभ मानल्या जाणाऱ्या महिन्याला धोंड्याचा महिना म्हटले जाते. बारा महिन्यांना स्वामी आहेत. या महिन्याचे स्वामित्व कोणीच स्विकारेना. शेवटी ही जबाबदारी भगवान पुरूषोत्तमाने घेतली, म्हणून त्यास पुरूषोत्तम मास असेही म्हणतात.

        यावर्षी श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. १८ जूलै पासून ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हा महिना आहे. अधिकमास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी हा महिना अत्यंत आदर्श काळ मानला जातो. अधिक मासाचा महिमा अगाध आणि अनाकलनीय आहे. या एका महिन्याच्या भक्तीमूळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटू शकतात, अशी श्रद्धा आहे. 

समतोल राखणारा महिना:-

        भारत हा संस्कृती जोपासणारा देश आहे. शतकानुशतके आपण सण-उत्सव साजरे करतो. अधिक मास हा या सर्व सणांमध्ये ⚖️ बॅलन्स ठेवतो. हा महिना आला नसता तर या सण-उत्सवांवर विरजण पडले असते. हा अधिक मास न आल्यास होळी थंडीत खेळावी लागली असती. तर दिवाळी ही पावसाळ्यात साजरी करावी लागली असती. सणांमध्ये समन्वय साधणारा महिना म्हणून याची ओळख आहे. 

अधिकमासाचा पौराणिक संबंध:-

अधिकमासाशी संबंधित अशी ही पौराणिक कथा आहे. एकदा दैत्याचा 🤴 राजा हिरण्यकश्यप याने कठोर तपश्चर्या करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले आणि आमरता हा वर मागितला. मात्र आमरता हा वर मागणे चुकीचे असल्याने ब्रम्हदेवाने त्याला दुसरे कोणतेही वरदान मागण्याचे सांगितले. त्यावेळी हिरण्यकश्यपाने ब्रम्हदेवाकडे असा वर मागितला की, संसारातील कोणताही मनुष्य, स्त्री, पशु, देवता किंवा राक्षस यापैकी कोणीही मला मारणार नाही. वर्षातील १२ ही महिन्यात मला मरण नको. दिवसा किंवा रात्री 🌃 मरण नको. कुठल्याही शस्त्र किंवा अस्त्राने शेवट नको. मला 🏡 घरात मारल्या जावू नये किंवा घराबाहेर सुद्धा मरण नको. अतिशय धुर्तपणे त्याने हे वरदान ब्रम्हदेवाकडे मागितले. ब्रम्हदेव प्रसन्न झाल्याने त्यांना ते देणे आवश्यक होते. त्यांनी तथास्तु म्हटले. ह्या वरदानामूळे हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि ईश्वरासारखं समजू लागला. असूरी शक्तीचा वापर करू लागला. अशावेळी भगवान विष्णूने अधिक मासात नरसिंह अवतार (अर्धा पुरूष आणि अर्धा 🦁 सिंह) घेवून प्रकट झाले. सायंकाळी नखांच्या सहाय्याने हिरण्यकश्यपाची छाती फाडून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. हा अधिक मास निर्मितीचा पौराणिक आधार मानला जातो.

महाराष्ट्रातील देवस्थान:- 

        अधिक मासाचे दैवत असलेल्या भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या गोदावरीच्या किना-यावर वसलेल्या गावात आहे. राजा 🤴 रामदेवराय कालीन हेमाडपंथी बांधणीचे मंदिर येथे आहे. भगवान पुरूषोत्तमाच्या या महिन्यांतील दर्शनाने पापक्षालन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. दर तीन वर्षांनी येणा-या अधिकमासात राज्यासह देशभरातील ५० लाखांहून अधिक भाविक दर्शनाचा लाभ घेतात. या मंदिराच्या स्थापत्य कलेचे वैशिष्ट्ये म्हणजे मंदिराच्या विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने त्या पाण्यावर तरंगतात. बाजूलाच सहालक्षेश्वर मंदिर, वरद विनायक आणि माता पार्वतीच्या पादूका असा त्रिवेणी संगम असलेले मंदिर आहे. नुकतेच राज्य सरकारने महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिराचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. त्यात पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तम मंदिराचा देखील समावेश करण्यात आला आहे. मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पात मंदिराचा जीर्णोद्धार, भाविकांना सोयी-सूविधा व इतर संलग्न कामांसाठी ५४.५६ कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे हे काम सुरू आहे. सध्या मंदिराचे पूर्नबांधकाम सुरू असून यावर्षी भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरती सोय केलेली आहे. भाविकांची सोय व्हावी यासाठी स्थानिक प्रशासन, गांवकरी आणि मंदिर व्यवस्थापन काळजी घेत आहेत.


डॉ गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय