गोदाकाठचे तिर्थक्षेत्र; श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी

 गोदाकाठचे तिर्थक्षेत्र; श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी

(प्रासंगिक: अधिक मास/ धोंड्याचा महिना विशेष)

        दर तीन वर्षांनी येणारा मराठी अधिक महिना म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना होय. त्यालाच मल मास, पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखले जाते. या अधिकमासाचे दैवत असलेल्या 'भगवान पुरुषोत्तमाचे' संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. आज आपण अधिक मास आणि पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाची महती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कल्याण ते विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गाजवळ माजलगाव पासून 21 किलोमीटर अंतरावर उत्तरेला पुरुषोत्तमपुरी हे गाव वसलेले आहे. तर खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर सादोळा फाट्याजवळ पश्चिमेला अवघ्या ६ की.मी. अंतरावर हे धार्मिक स्थळ आहे. माजलगाव पासून याठिकाणी दर अर्ध्या तासाला बसची सोय आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई हुन तलवडा मार्गे पुर्वेकडे जाणा-या राज्य महामार्गावरून ते २ कि.मी. अंतरावर तर जालना जिल्ह्यातील परतुर हून दक्षिणेकडे गोळेगाव या गावातून देवस्थानला होडीतून जाता येते. अधिक मासात महिनाभर गावोगावच्या पायी दिंड्या पुरुषोत्तमपुरी कडे वळतात.बस, ट्रॅव्हल्स, जीप, टेम्पो, कार सह मिळेल त्या वाहनाने भाविक पुरुषोत्तमच्या दर्शनाच्या ओढीने तिर्थक्षेत्रकडे धाव घेतात. राज्यभरातून या महिनाभरात 60 लाखावरून अधिक भाविक दर्शनाचा लाभ घेतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांसह विविध राज्यातून लाखो भक्तगण येथे भगवान पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी येतात. या अधिक मासात पुरुषोत्तमाचे दर्शन घेतल्याने पापक्षालन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या महिन्यातील दर्शनाने आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची भावना आहे. यावर्षी श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. १८ जूलै पासून ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हा महिना आहे. अधिक मास म्हणजे भाविकांसाठी मोठी पर्वणीच.

         या गावात तेराव्या शतकातील राजा रामदेवराय यांच्या काळातील हेमाडपंथी मंदिर दगड आणि विटांच्या सहाय्याने बांधलेले आहे. या बांधकामातील विटांची विशेषता अशी आहे की, त्या विटा पाण्यावर तरंगतात. विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने हा वैज्ञानिक चमत्कार पहावयास मिळतो. हे मंदिर पुर्वमुखी असून आतील गाभाऱ्यात गंडकी शिळेची भगवान पुरुषोत्तमाची मुर्ती आहे. हातात शंख, चक्र, पद्म, गदा धारण केलेली भगवान पुरुषोत्तमाची काळ्या पाषाणातील तीन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती मन मोहून टाकते. सभामंडपातील खांबांची कोरीव नक्षीकाम पाहून ऐतिहासिक कलाकृतींचे प्रत्येकजण तोंड भरून कौतुक करतो. मंदिराच्या उत्तरेस वाहणारी गोदामाय वैभवात भर घालते. गोदावरी नदीवर उभारलेला कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बारा महिने नदीपात्रात पाणी टिकवून ठेवण्यात मदत करतो. पुरातन काळात हा परिसर दंडकारण्यात होता. शार्दूल नावाचा दानव जनतेला त्रास देत होता. जनतेच्या याचनेला प्रतिसाद म्हणून भगवान विष्णूने पुरूषोत्तमाचा अवतार घेऊन हातातील चक्राने त्या त्रास देणाऱ्या दानवाचा शिरच्छेद केला व ते चक्र गोदावरीत धुतले. त्यामुळे या गोदावरी तिर्थास 'चक्रतिर्थ' असा नावलौकिक मिळाला. या महिन्यात चक्रतिर्थात स्नान केल्यास पापक्षालन होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. पुरुषोत्तम मंदिराच्या डाव्या बाजूलाच 'सहालक्षेश्वर' महादेवाचे सुंदर मंदिर आहे.  या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वरद विनायकाची चार फूट उंचीची मूर्ती आणि माता पार्वतीच्या पादूकाही आहेत. सहालक्षेश्वर महादेव, वरद विनायक गणपती आणि पादुकांच्या रूपाने माता पार्वती असा त्रिवेणी संगम शोधूनही सापडत नाही. शेंदूरवर्णीय वरद गणपती भक्तांच्या नवसास पावणारा असल्याने इथे मोठी गर्दी असते. निजाम राजवटीत पुरूषोत्तमपुरी हे मोठे संस्थान होते. तीन ताम्रपट आणि तांब्याचा गरुड अशी देणं होती व. नंतर मात्र हे हैदराबादच्या संग्रहालयात वर्ग करण्यात आले. इंग्रज कालीन गॅझेटिअर मध्ये पुरूषोत्तमपुरी  या गावाची नोंद आढळते.

        बारा महिन्याला बारा स्वामी आहेत. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक वाढत जावून ३३ दिवसांचा निघतो. दरवर्षीचे ११ दिवस मिळून तीन वर्षात अधिकचा एक महिना (३३ दिवस) म्हणजेच अधिक महिन्याचे स्वामित्व कोणीच स्विकारेना. शेवटी भगवान पुरुषोत्तमाने त्याचे स्वामित्व स्विकारले. या महिन्यात शुभकार्याला महत्व नसले तरी धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत लाभदायी आहे. या महिन्यात ३३ च्या प्रमाणातील दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ३३ धोंडे, ३३ अनारसे, ३३ बत्तासे, ३३ दिव अशा प्रकारचे जे घडेल ते दान करण्याची प्रथा आहे. जावयाचा धोंडेजेवण हा एक मराठी मातीचा प्रघात आहे. हिरण्यकश्यपाने ब्रम्हदेवाला अमरत्वासाठी अनेक वरदान मागितली होती. त्यात मला बारा महिन्यात मरण नको हे एक वरदान होते. त्यामुळे हिरण्यकश्यप मरणामागे एका जास्त महिन्याची निर्मिती म्हणजे अधिक मास निर्माण करावा लागला, असा पौराणिक कथेचा आधार या महिन्याला आहे.

महाराष्ट्राच्या मातीचे अनन्यसाधारण महत्त्व:-

        महाराष्ट्र राज्य हा जसा गडकिल्ल्यांसाठी ओळखला जातो तसेच संतांची भूमी म्हणूनही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राला प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पे यांचाही वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी विकसित केलेले  ३०० किल्ले हा महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे एकट्या महाराष्ट्रातच आहेत. गेल्या सहाशे वर्षात वारकरी संप्रदायाने देशपातळीवर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण केली असून आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आणि अष्टविनायक परिक्रमा हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता, सप्तशृंगी ही आद्य मात्र देवतांची साडेतीन शक्तीपीठे ही देखील महाराष्ट्राचेच वैभव आहेत. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि लेण्या शिल्पे यांना त्यांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. त्यासाठी गडकिल्ले संवर्धनासोबतच प्राचीन मंदिरे, लेण्या, शिल्पे यांचा जिर्णोद्धाराचे व संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.यात पुरूषोत्तमपुरी येथील सातशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक हेमाडपंथी पुरूषोत्तम मंदिराचे जतन आणि संवर्धनाचा अग्रक्रम राज्य सरकारने जाहीर केला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ही संस्था अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त केली आहे.


मंदिराचा जीर्णोद्धार व परिसर विकास:-

        या ठिकाणाचे माहात्म्य जाणून,वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन, पुनर्वसन आणि परिसर विकास अशी यामागची राज्य सरकारची उदात्त भावना आहे. मार्च-२०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील आठ प्राचीन मंदिरांना विकास निधी देण्याचा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (MSRDC) द्वारे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील सातारा चे खंडोबा मंदिर आणि पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाचे हेमाडपंथी मंदिर यांचा त्यात समावेश करण्यात आला. २७ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील ५४.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून निवेदेद्वारे विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मंदिराचे सपाटीकरण करून जिर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भाविकांना यावर्षीच्या अधिक मासात तात्पुरत्या शेड मध्ये दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यात आला असून प्राचीन मंदिरांच्या धर्तीवर नवीन मंदिर उभारले जाणार आहे. गोदावरी चक्रतीर्थावर घाट बांधला जाणार आहे. भक्तनिवास, पार्किंग, गावाजवळील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाला रस्त्यांची जोडणी, दर्शनबारी, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदींसह विविध पहिल्या टप्प्यातील विकासकामे सुरू आहेत. मंदिराचे दगडी बांधकाम हे चुन्यामध्ये केले जाणार आहे. गावातील तरूणाई, स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी सदैव तत्पर असते.


डॉ गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर


Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय