फास्टफूड व जंकफूडचा जमाना

 फास्टफूड व जंकफूडचा जमाना

        मानवी जीवनाला अन्नाची गरज असते. भूक शमविण्यासाठी खायला अन्न लागते. मात्र धकाधकीच्या जीवनात मनुष्य प्राण्याच्या खानपानाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडून आले आहेत. सकस आहाराकडून त्याची पाऊले कधी जंकफूड, फास्टफूड कडे वळली हे त्याच्या लक्षातच आले नाही. जेंव्हा लक्षात आले तेंव्हा फार उशीर झालेला असतो. त्यामुळे जीवनात मिळालेल्या शरीररुपी अमूल्य देणगीचा योग्य विनियोग केला तर कठीण काहीच नाही, मात्र दुर्लक्ष केले तर अवघड होऊन बसेल हे निश्चित आहे. रेडी टू ईट ही संकल्पनाच घातक ठरत आहे.

         पुर्वी आहारात हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळ्या दाळी, दुध, तुप, भात यांचे प्रमाण भरपूर होते. त्यामुळे व्हिटॅमिन, मिनरल्स, फॅट, प्रोटीनयुक्त आहार मिळायचा. अंडी, 🐔 चिकन, मटन, 🐟 मासे हे दर्जेदार स्वरूपाचे होते. अंगमेहनतीची कामं केली जात असल्याचे व सकस आहार मिळाल्याने शरीरयष्टी मजबूत होती. कोणतेही आजार सहजासहजी होत नसतं. ग्रामीण भागात तर शुद्ध पाणी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. नदीचे, ओढ्याचे, वळणाचे, विहीरीचे असे कुठलेही पाणी शरीराला सहज पचत होते. मात्र बदलत्या काळाप्रमाणे मानवाच्या आवडी निवडी सोबतच आहारात देखील लक्षणीय बदल झाले. हिरव्या पालेभाज्या खाणा-यांचे प्रमाण कमी झाले. लहान मुलांच्या खाण्यात तर अमुलाग्र बदल झाले. 

         पुर्वी सहसा आई-वडिलांनी मुलांना कधीच ✋ हाताने भरवले नाही, कारण कामातून त्यांना वेळच नव्हता. सुर्योदया पासून ते सुर्यास्ता पर्यंत कामच काम असल्याने मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने कामात यंत्राची मदत झाल्याने, नोकरी- कामानिमित्त शहराकडे स्थलांतर झाल्याने मुलांना द्यायला वेळ मिळाला. मात्र हा वेळ टी.व्ही., मोबाईल, कम्प्यूटर, यांसारख्या बाबींवर  खर्ची होवू लागला. लहान मुलांना जेवू घालणे एक अग्निदिव्य बनले. खाण्यापिण्यासाठी मुलं 👃 नाक मुरडायला लागली. पालक बिस्किटे, वेफर्स, जॅम, जेली, चॉकलेट 🍫 त्यांना देवू लागले. हिरव्या पालेभाज्या, डाळी आहारात असतील तर मुलं कमी जेवू लागले. खातात तर खावू द्या, अशी पालकांची उदासीनता मुलांना कधी फास्ट फूड, जंकफूड कडे घेऊन गेले हे कळलेच नाही.

         फास्ट फूड म्हणजे जे आपण हाँटेलमधून मागवतो. 🍕 पिझ्झा, बर्गर, चाऊमीन, पास्ता , फ्रेंच फ्राईज, नुडल्स, ओनियन रिंग, टाकोज, फ्रँकी, नाचोस, तळलेले क्रिप्सी चिकन, आईस्क्रीम, डोनेट, 🍰, बिस्किटे सारखे पदार्थ यात मोडतात. तर जंकफूड हे बंद पॅकेट मध्ये उपलब्ध असते. ते तयारच असते. फक्त पॅकेट फोडायचे आणि ते खायचे. ज्यांना जास्त काळ खाण्यासाठी संरक्षित केले जाते साठवले जाते त्याला प्रोसेस फुड  म्हणतात. यामध्ये फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केला जातो. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. फास्टफूड मध्ये कुरकुरे, चिप्स, 🌽 कॉर्न चिप्स, कुकीज, 🍭 कँडी, वेफर्स, सेंडविच अशा बंद पाकिटातील पदार्थ तर पिता येतील असे सॉफ्ट ड्रिंक, सोडा यांचा समावेश होतो. मुलं हट्ट करतात, पालक कोणताही विचार न करता त्यांना हवे ते देतात. अनेक मुलांना तर याची सवयच जडली आहे. मात्र शरीराला हे घातक आहे. 

जंकफूड व फास्टफूड चे दुष्परिणाम:-

        पोटातील चरबीचे प्रमाण वाढत आहे. दात किडत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्वास्थ्य यंत्रणा धोक्यात येत आहे. जंकफूड व फास्टफूड ही लहानग्यांची समस्या न राहता अनेक युवावर्ग याच्या आहारी गेला आहे. उबेर, स्वागत, झोमॅटो सारख्या डिलीव्हरी कंपन्या 🌃 रात्री उशिरापर्यंत 🏡 घरपोच सेवा देत आहेत. पुणे, बेंगळुरू सारख्या आयटी पार्क परिसरात याचे पिक आले आहे.  

         जंकफूड व फास्टफूड च्या नियमित सेवनाने चांगल्या पेक्षा दुष्परिणामच जास्त आहेत. ते खाल्ल्याने अधिक थकवा येतो. जंकफूड मधील मीठ, साखर, ट्रान्स फॅट्स चे अतिरिक्त प्रमाण अनेक आजारांना निमंत्रण देत आहेत. अतिरिक्त सोडियममूळे रक्ताभिसरण संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. लहान मुलांच्या पचनसंस्था बिघडत आहे. एडेमा सारखा आजार होवून किडणी खराब होण्याचा धोका आहे.त्यातील फॉस्फेट मूळे हाडे कमकुवत होतात. पोषणमूल्ये मिळत नसल्याने विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, जंक फूड खाल्ल्याने डिप्रेशनची समस्या निर्माण होत आहे. जे मुलं जास्त जंक फूड खातात त्यांचे वर्तन हिंसक आढळले आहे. अगदी प्रजनन क्षमतेवर देखील हे परिणाम कारक आहे.खाद्य आणि आरोग्य संबंधी एका अहवालात म्हटले आहे की फास्टफूड आरोग्यासाठी धूम्रपानापेक्षाही जास्त घातक आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डीजीज 2017 च्या आकडेवारीनुसार जगात 20 टक्के लोकांचा मृत्यू फास्ट फूड खाल्ल्याने होतो आहे. व्यक्ती गरिब असो की श्रीमंत जंकफूड व फास्टफूड खाल्ल्याशिवाय त्यांचे भागत नाही.

धोका टाळायचा असेल तर:-       

         मात्र भविष्यातील हा गंभीर धोका टाळायचा असेल तर जंकफूड व फास्टफूड पासून लांबच राहिले पाहिजे. शक्य तितका नैसर्गिक व संतुलित आहार घेतला पाहिजे. लहानगे हे मोठ्याचे अनुकरण करत असतात, त्यामुळे मोठ्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आहारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात असल्या पाहिजेत. हिरव्या पालेभाज्याच्या सेवनाने पचनशक्ती चांगली होते. व्हिटॅमिन, फॅट, मिनरल्स , प्रोटीनयुक्त आहार घेणे काळाची गरज आहे. कच्च्या भाज्या-फळे  भरपूर प्रमाणात खाल्ली पाहीजेत. दुध, अंडी, चिकन, मटन, वरण-भात, पोळी-भाजी, एकवेळ ज्वारी किंवा बाजरीची भाकरी अशा पदार्थांची गरज आहे.


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय