दरडी का कोसळतात?

 दरडी का कोसळतात?

        रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी गावातील आदिवासी वसाहतीवर मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ९८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या ३ दिवसात सुमारे ४९९ मिमी पाऊस झाला असून सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. एनडीआरएफचे ६० जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून ५०० कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे सुद्धा तेथे आहेत. उपमुख्यमंत्री पवार मदत कक्षात बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. जनतेला या दुर्घटनेबद्दल हळहळ वाटत आहे. 

          यापूर्वी  माळीण, तळीये येथे देखील अशाच मोठ्या प्रमाणात जिवीतहानी करणा-या दुर्घटना झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण मध्ये दरड कोसळून ४४ 🏡 घरं 🗻 डोंगराखाली गेली. त्यात १५१ जणांचा बळी गेला. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातल्या व्यक्ती जिवंत नव्हत्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावांवर देखील अशीच दुर्दैवी घटना घडली. या घटनेत संपूर्ण ३२ घरांचे गाव मातीच्या ढिगा-याखाली गाडलं गेलं. यात ८७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारच्या दुर्घटना होण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नाही. अनेकवेळा अशा भयावह घटना घडलेल्या आहेत. ११ जूलै २००५ रोजी मुंबईतील अँन्टॉप हिल येथे दरड कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पाच गावांमध्ये डोंगरकडा कोसळून २५ जुलै २००५ रोजी १९४ ठार तर ५ सप्टेंबर २००९ रोजी मुंबईतील साकीनाका येथे दरड कोसळून १२ जण ठार झाले. जूलै २०२१ मध्ये चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर, कळवामध्ये ३० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. मागिल काही वर्षांत या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. एनडीआरएफ सारखी यंत्रणा देशात प्रथमच राज्याने देखील सुरू केली. अशी घटना घडली की, चार दिवस त्याची चर्चा होईल. सरकार यापुढे काय करणार याची माहिती देईल. विरोधक कोणता तरी कंगोरा पकडून टिका करील. इलेक्ट्रॉनिक मिडिया, वर्तमानपत्रे त्यावर चर्चा करतील. समाजमाध्यमात चर्चेच्या फैरी झडतील. शासनाची मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. जखमींचा खर्च सरकार करणार आहे. मात्र यावर ठोस उपाययोजना कधी केल्या जाणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.

दरड कोसळणे:- 

        भूस्खलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया झाली असली तरी मानवनिर्मित कारणामुळे भूस्खलन होत राहते. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील संधी, भेगा, फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते. वजन वाढते आणि अशा प्रकारच्या संधी, भेगा, फटी विस्तारित होऊन खडकांचे तुकडे अलग होऊ लागतात. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे असे म्हणतात. घाट रस्ते तयार करताना झालेली  वृक्षतोड, खणलेले चर, उतारांचे केलेले सपाटीकरण, उभारलेली सिमेंटची जंगले ही पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमुख कारणं आहेत. डोंगरात नवीन रस्ते बांधताना किंवा रुंदीकरणादरम्यान उतारांवरील बदलांमुळे ; तसेच बोगदे खणताना उडणाऱ्या सुरुंगांमुळे डोंगरांवरील तडे गेलेले खडकांचे थर अस्थिर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला थराचा आधार सुटतो आणि अतिवृष्टीच्यावेळी ते कोसळतात. पश्चिम घाटात घडणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना मानवनिर्मित आपत्ती आहेत. डोंगर उभे कापून घाट केल्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी जून महिन्यातच घाटांमध्ये असे प्रकार घडतात. कारण उन्हाळ्यात डोंगरकड्यावरील खडक तापतात आणि सेल होतात. पावसाळ्यात खडकाला पडलेल्या भेगांमधून त्याची रूंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. जोराचा पाऊस पडल्यावर दगड उताराच्या दिशेने कोसळतात.

        महाराष्ट्र राज्यातील पंधरा टक्के भूभाग दरड प्रणव असून त्यामध्ये नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश होतो. उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री हा परिसर अत्यंत 🗻 डोंगराळ असा प्रदेश आहे. तेथे पर्यटकांना सुविधा देण्याच्या नावाखाली अनेक प्रकल्प उभारण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. डोंगर फोडून बांधकामे करण्यात आली. खोदकाम मोठ्या प्रमाणावर झाल्याने जमीन भुसभुशीत झाली. पर्यायाने भूस्खलन मोठ्या प्रमाणात होऊ लागली. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे ढगफुटी अथवा दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले.

उपाययोजना:- 

  • दरड कोसळणाऱ्या भागाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
  • जिल्हा प्रशासनाच्या मदतीने दरड प्रणव परिसरातील ग्रामस्थांची समस्ती स्थापन करावी व पर्जन्यवृष्टीचा आढावा घ्यावा.
  • पाण्याची नैसर्गिक प्रवाह कशी आहेत, डोंगर माथ्यावर कुठे भेगा पडल्या आहेत याची माहिती घ्यावी.
  • संभाव्य धोका टाळण्यासाठी व हानीची तीव्रता कमी करण्यासाठी संरक्षक भिंत उभारावी,  धोकादायक भागाला जाळी बसवावी, पाणी साचू नये यासाठी उपाय करावेत.
  • डोंगरावर वृक्षसंपदा वाढवावी.
  • मोठ्या प्रमाणात दगड माती खाली येते तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये.
  • पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड-माती मोठ्या प्रमाणावर येते, तेंव्हा तिथेच थांबून मदतीची वाट पहावी, वाहने पुढे नेऊ नयेत.
  • जंगलाचा नाश होणार नाही असे प्रकल्प राबवावेत. वृक्षांची तोड होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • धोक्याच्या ठिकाणच्या लोकवस्ती हटवाव्यात, सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारा द्यावा.
  • जमीन सपाटीकरण थांबवावे.
  • एनडीआरएफ च्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पथकाची स्थापना केली जावी.
  • धोकादायक दगडं बाजूला करावेत.
  • पावसाळ्यात अशा ठिकाणी लोकांनी राहू नये.
  • दरड कोसळणाऱ्या भागात मार्किंग करून तिथे मनुष्य वस्ती होणारच नाही याची काळजी घ्यावी. सर्व गोष्टी शासनावर अवलंबून न राहता जनतेने देखील आपण आपली काळजी घ्यावी.
  • डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचा जिओलॉजिकल सर्वे करण्यात यावा.
  • विशेष धोरण आखून डोंगरकड्याच्या वाड्या-वस्त्या उठवून नवीन उंच ठिकाणी स्थलांतरित कराव्यात.

        निसर्ग समोर माणूस हतबल आहे. वायु, अग्नी, पाणी यासोबत खेळलोत तर ते आपल्याला सोडणार नाहीत. विकास करताना निसर्गाला क्षती पोहोचवली तर निसर्ग आपल्याला सोडणार नाही एखाद्या प्रकल्पासाठी झाडे तोडली तर प्रकोप अटळ आहे. शासनाने दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजेत. त्यासोबतच जनतेने देखील काळजी घेतली पाहिजे.


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय