शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान
शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान
शेती करणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. शिवाय मजूर मिळणे ही कठीण बाब
झाली आहे. मिळाले तर जास्तीची मजुरी मागतात. वेळेवर कामे केली नाहीत तर प्रत्येक
गोष्टीवर परिणाम होतो. पीक फवारणी वेळेत झाली नाही तर पिकावर जास्तीचा रोग फैलावतो.
वेळेवर कामे करावयाची असतील तर तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. कमी कष्टात आणि
उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कमी
काळात अधिक प्रभावी वापर व जास्तीतजास्त लाभ घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान हे अतिशय
उपयुक्त ठरत आहे. केंद्र-राज्याचा हातभार, सहकार क्षेत्राचे योगदान आणि जनतेचा उदंड सहभाग
हे ड्रोन वापरातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर शेतकर्यांसाठी
आदिक किफायतशीर मानला जातो. जास्तीचे उत्पादन मिळवत अॅग्रोकेमिकल्स, खते, फवारणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत
होते.
DRONE चे विविध शब्दाचे संक्षिप्तरूप आहे:-
D (डी) –
डायनॅमिक
R (आर) –
दूरस्थपणे
O (ओ) –
ऑपरेट केलेले
N (एन) –
नॅव्हीगेबल
E (ई) –
उपकरणे
ही उपकरणे हवेत,जमीनीवर आणि वेळप्रसंगी पाण्याखाली सुद्धा काम करतात.
ड्रोन सेन्सरचा शेतीसाठी उपयोग:-
- शेती
व्यवस्थापनाचा विचार करताना किडी आणि रोग, तण यावर फवारणी आणि खते
पसरवण्यासाठी ड्रोन तंत्राचा उपयोग होऊ शकतो.
- ड्रोन
पिकांची व पशुधनाच्या हालचालीची प्रत्यक्ष माहिती देतो.
- हवामान
बदलामुळे पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होते पिकांची वाढ व पिकांचे
आरोग्य पाहण्याचे काम ड्रोन करू शकतो.
- ड्रोन
चा उपयोग मातीचे परीक्षण मातीचे विश्लेषण करण्यासाठीदेखील केला जातो त्यामुळे
मातीमध्ये योग्य पीक आपण घेऊ शकतो. तसेच आणि मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता
असल्यास आपण ती कमतरता दूर करू शकतो.
- उभ्या
पिकामध्ये पक्ष्यांचा खुप त्रास शेतकऱ्यांना होत असतो त्यावेळी देखील हा
ड्रोन शेतकऱ्यांच्या उपयोगी पडून पिकांची राखण करू शकतो.
- थर्मल, हाइपर् स्पेक्ट्रल या सेन्सर च्या
साह्याने ओलाव्याची कमतरता असलेला भाग शोधून काढू शकतो.
ड्रोन तयार करण्यासाठी मूलभूत बाबी :-
- फ्रेम:- ड्रोन असेंब्लीसाठी फ्रेम हे पहिले पॅरामीटर आहे. फ्रेमचा आकार १८० मिमी ते ८०० मिमी पर्यंत असू शकतो किंवा त्यापेक्षा मोठा असू शकतो. एकूण आकार, पेलोडचे वजन, फ्लाइंग एरिया इत्यादी मापदंडांचा विचार करून फ्रेमचा आकार निश्चित केला जातो. १५०मिमी पेक्षा कमी आकाराच्या फ्रेमला मायक्रो फ्रेम म्हणले जाते. १५० मिमीपेक्षा मोठी फ्रेम एक मिनी फ्रेम मानली जाते.
- फ्लाइट कंट्रोलर:- ड्रोन फ्लाइट कंट्रोलर किंवा एफसीला ड्रोनचा मेंदू म्हणता येईल. हा एक प्रकारचा विविध सेन्सर असणारा मायक्रोप्रोसेसर आहे आणि याच्या सहाय्याने ड्रोनवर नियंत्रण ठेवता येते.
- इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर (ईएससी):- ईएससी फ्लाइट कंट्रोलर आणि मोटरला एकमेकासोबत जोडते. प्रत्येक मोटारला ईएससी जोडणे आवश्यक असते. ईएससीचे मुख्य काम हे ड्रोनचा वेग नियंत्रीत करणे हे आहे.
- मोटर्स:- ड्रोन्समध्ये वापरल्या गेलेल्या मोटर्स सामान्यत: ब्रशलेस डीसी मोटर्स असतात. या मोटर्स मजबूत असतात आणि दीर्घकाळ टिकणार्या असतात. मोटर रेटिंग केव्ही मध्ये मोजली जाते.
- प्रोपेलर्स:- सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रोपेलर्स. प्रोपेलर्स ड्रोनला हवेत उचलण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात. प्रोपेलरचा आकार मोटर रेटिंगवर अवलंबून असतो।
- बॅटरी:- बहुतेक वेळा लिपो (लिथियम पॉलिमर) बॅटरी ड्रोनमध्ये वापरल्या जातात.
- फ्लाईट कंट्रोलर:- ड्रोन फ्लाइट कंट्रोलर किंवा एफसीला ड्रोनचा मेंदू म्हणता येईल. हा एक प्रकारचा विविध सेन्सर असणारा मायक्रोप्रोसेसर आहे आणि याच्या सहाय्याने ड्रोनवर नियंत्रण ठेवता येते.
- ट्रान्समीटर आणि रिसीव्हर:- ड्रोनला नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. ट्रान्समीटरची रेंज त्याच्या डिझाइनवर अवलंबून असते.
वरील ड्रोनचे
मुख्य घटक असून आणखी इतरही काही बाबी लागतात. जसे की कॅमेरा, गिंबल, सर्वो मोटर्स, नियंत्रक, सोल्डर मशीन, सेन्सर्स, जीपीएस इ.
कष्टप्रद जीवन टाळणे:-
पूर्वी फवारणी कण्यासाठी शेतकर्यांना पंप
पाठीवर घेवून दिवसभर पाण्याच्या वजनासह पावसाळ्यात चिखलात वणवण फिरावे लागे.
त्यासाठी हाताने पंपाची हालचाल करावी लागे. पेट्रोल मशीनवर चालणारा पम्प असेल तर
त्यासाठी स्पीडने पळावे लागे. वयस्कर माणसाची हे काबाडकष्ट करताना दमछाक होत असे.
अनेक ठिकाणी तर विषारी औषधामुळे शेतकरी बळी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता
ड्रोनच्या सहाय्याने तणनाशक किंवा कीटकनाशक फवारायचे असेल तर बसल्या जागेवर सर्व
प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. ड्रोनला जोडलेल्या टाकीत १० ते २० लीटर पाणी व औषध
किंवा तणनाशक टाकायचे. रिमोटच्या सहाय्याने ते उंच झेपावते. ६ ते १० मिनिटाच्या आत
एक एकर शेती फवारली जाते. पूर्वी हे काम करायला एक दिवस सुद्धा पुरत नव्हता.
कोणतेही ओझे उचलण्याची गरज राहिली नाही. शिवाय औषध व पाण्याची बचत होते. कितीही
चिखल असला तरी कोणताही फरक पडत नाही. म्हणजे वेळेवर काम होवून पैशाची बचत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा जीव
धोक्यात जात नाही. पेरणी साठी सुद्धा ड्रोन उपयुक्त ठरत
आहे. उत्तर प्रदेशातील जबलपूरमधील तरुण अभियंता अभिनव ठाकूर याने ड्रोनची मदत घेत आधुनिक पेरणीची नवीन पद्धत शोधून काढली. त्याने ३० किलोपर्यंत वजन उचलू शकणारे ड्रोन तयार केले आहे, एक टाकी बसवली आहे, ज्यामध्ये भात किंवा
गव्हाच्या बिया भरल्या जातात आणि नंतर शेतात उडवून बिया शिंपडल्या जातात. यात शेताचा नकाशा मोबाईल किंवा टॅबलेटमध्ये
गुगल मॅपच्या साहाय्याने फीड केला जातो, तो सुरू
केल्यानंतर तो आपोआप शेताच्या क्षेत्राचा नकाशा तयार करतो. बियाणे किंवा बॅटरी संपली
आहे. त्यानुसार पेरणी करत राहते आणि बियाणे किंवा बॅटरी संपल्यानंतर ते आपोआप
त्याच्या जागी उतरून थांबते. हा देशातील सर्वात मोठा कृषी ड्रोन आहे, जो एकावेळी तीस लिटर औषध फवारू शकतो. एकदा उड्डाण केल्यानंतर हा ड्रोन ६ हेक्टरचे कव्हरेज देतो. ड्रोन तंत्रज्ञानामुळे
कमी वेळेत आणि कमी खर्चात आधुनिक शेतीमध्ये क्रांती होत आहे, असे सहज म्हणता येईल. ड्रोनने ३० एकर पिकावर एका दिवसात औषध फवारणी (Drone medicine spraying) केली
जाऊ शकते, फीबद्दल बोलायचे झाले तर एका दिवसाची फी ५०० ते ९०० रुपये आहे.
महाराष्ट्र
सरकारच्या ड्रोन प्रशिक्षण संस्था :- १८ ते ६५ वयावरील कोणत्याही नागरिकांना ड्रोन पायलट बनवण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहेत.
त्यासाठी खालील संस्थांना परवानगी दिलेली आहे.
- अकॅडेमी
ऑफ करियर व्हीएशन, पुणे
- रेडवर्ड
फ्लाईट ट्रेनिंग अकॅडेमी, बारामती
- आदिसा
ड्रोना, कोल्हापूर
- ड्रोन
आचार्य एरिअल इनोव्हेशन्स
- महात्मा
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
- बॉम्बे
फ्लाइंग क्लब, मुंबई
- तेरणा
पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद
ड्रोनचे फायदे:-
- उत्पादनात वाढ – या तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहेत. मातीचे परीक्षण, योग्य वेळी योग्य खते आणि वेळेवर फवारणी यामुळे शेतीतील उत्पादन वाढणार आहे.
- प्रभावी आणि अनुकूल तंत्रज्ञान – ड्रोन मुळे शेतकर्यांना वातावरणातील बदलांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला याचा प्रभावी रीतीने फायदा होणार आहे.
- शेतकर्यांची अधिक सुरक्षितता – जोखमीची आणि कष्टाची कामे कामातून शेतकर्याची बर्याच अंशी सुटका होणार आहे. तसेच सुरक्षितरीत्या कामे ड्रोन च्या माध्यमातून होणार आहेत.
- संसाधनांचा कमी अपव्यय – या ड्रोनमुळे खते, पाणी, बियाणे आणि कीटकनाशके यासारख्या सर्व संसाधनांचा कमी वापर करण्यास मदत होणार आहे॰
- अचूकता दर - महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की शेतकर्यांचे ७/१२, बांध किंवा धुर्याचा वाद कायमचा मिटवण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करून दिले जाणार आहे. हे ड्रोन सर्वेक्षण शेतकऱ्यांना जमिनीच्या अचूक आकाराची गणना करण्यास, विविध पिकांचे विभाजन करण्यास आणि माती सर्वेक्षणात मदत करणार आहे.
- पिक विम्याच्या दाव्यांसाठी उपयुक्त - कोणतेही नुकसान झाल्यास शेतकरी ड्रोनद्वारे कॅप्चर केलेल्या आकडेवारी चा वापर करून पिक विम्याचा दावा करण्यासाठी ड्रोन नी घेतलेल्या आकडेवारी चा वापर करू शकतात.
- सिंचन निरीक्षण- हायपरस्पेक्ट्रल, थर्मल किंवा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्ससह ड्रोन, खूप कोरडे असलेले किंवा शेतकऱ्याला सुधारण्याची गरज असलेले क्षेत्र ओळखतात. ड्रोन सर्वेक्षण पाण्याची कार्यक्षमता सुधारण्यास आणि सिंचनातील संभाव्य गळती उघड करण्यास मदत करते.
याशिवाय वेळेची बचत होईल, कमी मेहनत घ्यावी लागेल, शेतातून भाजीपाला, फळे, मासे इत्यादी बाजारात नेण्यासाठी, वस्तू कमीत
कमी नुकसानीसह थेट बाजारपेठेत पुरवल्या जातील, कमी वेळ
लागेल, परिणामी शेतकरी आणि मच्छीमारांना अधिक नफा, विकासामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, पीक फवारणी, पेरणी, मातीचे विश्लेषण, पीक नुकसानीची पाहणी किंवा
सर्वेक्षण अशी अनेक न संपणारी यादीच ड्रोनचे फायदे म्हणून सांगता येतील.
किंमत आणि सबसिडी:-
ड्रोनची किंमत ३ लाखां पासून मोठ्या रक्कमेपर्यंत आहे. यासाठी कंपनी हमीही देते. काही तांत्रिक बिघाड झाल्यास, कंपनी ते दुरुस्त देखील करते. ड्रोनचे आयुष्य सुमारे ३ वर्षे असले तरी अनेक वेळा ड्रोन अधिक वर्षे व्यवस्थित चालत राहतात. ड्रोन खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकार ४० ते १०० टक्के सबसिडी देत आहेत. अधिकाधिक लोकांनी ड्रोनचा वापर करावा, हा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे देशातील शेती व्यवसायाला चालना मिळेल. इतर
कामेही सोपी होतील. प्रधानमंत्री किसान ड्रोन योजना २०२३ अंतर्गत विविध
वर्ग आणि विभागातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर विविध अनुदाने उपलब्ध करून दिली
जातात. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये किसान ड्रोनसाठी विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. फक्त सरकारी मदतीवर अवलंबून न राहता महाराष्ट्र आणि राजस्थानातील शेतकरी
पुत्रांनी याचा वापर केंव्हाच सुरू केला आहे. ग्रामीण भागात आणि विशेषत: शेती क्षेत्रात नवीन बदलांची नांदी होणार आहे. डिजिटल
क्रांती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत आहे आणि म्हणूनच शेतीला
त्याच्या कक्षेत आणण्याची वेळ आली आहे.
छत्रपती संभाजीनगर

Comments
Post a Comment