स्त्रिभ्रुणहत्या; एक अभिशाप

 स्त्रिभ्रुणहत्या; एक अभिशाप 

          समाजात आदिशक्तीचे रूप म्हणून स्त्रीकडे पाहीले जाते. भावना चांगली असली तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. या देविस्वरूप आदिशक्तीचा जन्मापूर्वीच गळा घोटला जातो. वेदकाळात वेद अध्ययनाचा स्त्रियांना अधिकार होता. बौद्ध काळात महात्मा बुद्धांनी स्त्रियांना समानतेने वागण्याची दिशा दिली. राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, पं.ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकमान्य टिळक यांसारख्या विचारवंतांनी स्त्री परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. पितृसत्ताक कुटूंब पद्धतीमुळे स्त्रियांना समाजात दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळू लागली. ज्या ज्या कुटूंबात 'पिता' किंवा 'भाऊ' कुटूंबप्रमुख असतो. वंश पित्याच्या नावाने चालतो,  कुटूंबातील स्त्रियांचा दर्जा दुय्यम असतो, पत्नी विवाहा नंतर पतीच्या घरी राहावयास येते अशा कुटूंबास पितृसत्ताक कुटूंब असे म्हणतात. ही कुटूंबे पितृस्थानीय असतात. या कुटूंबात पित्याचा म्हणजे कर्त्याचा शब्द अखेरचा मानला जातो. पित्याच्या मृत्यूनंतर वयाने मोठा असणाऱ्या पुरुषाकडे परंपरेने हे अधिकार हस्तांतरित होतात. त्यावेळी स्त्री ही परक्याचे धन आहे, अशी धारणा होती. त्यामुळे पुरुषी वर्चस्व असलेली कुटूंब पद्धती स्त्रिभ्रुणहत्येला कारणीभूत ठरली. 'वंशाला दिवा हवा' हे विचार पुरुषांप्रमाणेच स्त्रियांच्या मनावर देखील बिंबवले गेले. जन्माला आल्यापासून मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळी वागणूक दिली जावू लागली. या भूमिकेमुळे समाजामध्ये वागावे कसे, बोलावे कसे, कोणते कपडे घालावेत,कोठे जावे, कुणाबरोबर जावे याबाबतीत मुलगा आणि मुलगी यांच्यात वेगळेपणा दिसून आला. यातूनच मुलींनी शॉर्ट कपडे घालू नयेत, जास्त शारीरिकश्रमाची कामे करू नयेत, अवघड आणि शारीरिक श्रमाचे खेळ फक्त मुलांनीच खेळावेत असे संकेत निर्माण झाले. मुली नाजूक असतात, अशी समजूत यामागे निर्माण केली. मुलं-मुलींसाठी वेगवेगळ्या खेळण्या निर्माण झाल्या. 

           आधुनिक काळात 'चूल आणि मूल' इतक्यावरच सीमित न राहता सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक कार्य करताना त्या दिसून येतात. बँका, सरकारी कार्यालये, वैद्यकीय,शासकीय, व्यवस्थापकीय,  बालवाडी ते विद्यापीठ, सेविका ते कुलगुरू,  राष्ट्रपती पदापर्यंत तिची मजल गेली आहे. सर्वच क्षेत्रे तिने पादाक्रांत केली. शिक्षणाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर तिने ते सिद्ध केले. मात्र भारतीय समाजाची मनोवृत्ती परिवर्तन स्वीकारण्यास पटकन तयार होत नाही. मातृत्व, प्रजनन हे स्त्रिवर्गाकडे असल्याने तिच्या प्रगतीत तो अडथळा ठरला. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. वंश वाढवायचा तर मुलगाच हवा, अशा दुर्भागी लालसेमूळे स्त्रिभ्रुणहत्येचे प्रमाण वाढत गेले. जन्मलेले बाळं मुलगी असेल तर, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. मुलगी नको, मुलगाच हवा असा अट्टाहास वाढू लागला ‌ त्याला विज्ञानाने साथ दिली. सोनोग्राफी सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लिंगनिदान केले जावू लागले. मुलीचा गर्भ असेल तर तो काढून टाकण्यात येवू लागला. १९७० पासून प्रसुती पूर्व चाचण्या होवू लागल्या. गर्भाची वाढ नीट व्हावी, अशी यामागची भूमिका होती. पंजाब, हरियाणा सारख्या राज्यात तर मोठमोठे बोर्ड लावत्यात आले की ,'आता पाचशे द्या आणि उद्याचे पाच लाख वाचवा'. हे पाच लाख म्हणजे उद्या मुलीला द्यावा लागणारा 'हुंडा' होता. 'अँम्निओसेंटसिस आणि कोरीऑनिक शिवाय बायोप्सी' मध्ये गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यातच लिंगनिदान तपासणी शक्य होते. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी मध्ये चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात गर्भलिंग ओळखता येते. शुक्राणू विलिनीकरण तंत्रामुळे स्त्रीगर्भ नष्ट करणे सुलभ झाले. १९९४ मध्ये पी.एन.डी.टी. कायदा केला मात्र परिणाम कारक अंमलबजावणी झाली नाही. शासकीय पातळीवरील 'हम दोन, हमारे दो' ही घोषणा कागदावरच राहिली. १९८१ ला हरियाणा सारख्या राज्यात दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ८७० इतके खाली घसरले. २०११ मध्ये महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यातही ते ९२५ झाले. राज्यात दररोज सरासरी १०७ स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. देशात दररोज १६०० स्त्री भ्रूणहत्या होत असल्याचे समजते. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत ४ लाख ६८ हजार ६८० मुलींना गर्भातच मारण्यात आल्याची माहिती राज्य आरोग्य खात्याने आपल्या टिपणीमध्ये नमूद केले आहे. गेल्या तीन दशकांत भारतात ४२ लाख ते १ कोटी २१ लाख स्त्रीभ्रूणहत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.टोरांटो विद्यापीठाच्या पथकाने हे सर्वेक्षण केले आहे. सातारा जिल्हा सुद्धा यात अव्वलस्थानी आहे.सांगलीतही परिस्थिती वेगळी नाही. वाळवा तालुक्यात तर २००९ साली एक हजार मुलांमागे ७९८ मुली असे प्रमाण होते. गुजरात सारख्या राज्यातील अहमदाबाद शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम जवळील बापूनगर भागात एका कचरापेटीत १४ अर्भके सापडल्याने खळबळ उडाली. बीड जिल्हा सुद्धा यातील सर्वात मोठा कत्तलखाना समजला जातो. जनगणनेत १००० मुलांमागे ८०० मुली असे दुर्दैवी प्रमाण जिल्ह्यात आढळले. 

        मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे याचे समाज जीवनावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. कायद्यातील पळवाटा, प्रबळ लोकांचा वरदहस्त, सत्ता व संपत्ती यांच्या सहाय्याने कठोर कारवाई अंमलात येईल असे वाटत नाही. यामुळे मुलींची कमतरता भासू लागली. विवाहयोग्य मुलांच्या संख्येत वाढ होवू लागली. पुर्वी मुलांना हुंडा द्यावा लागत होता, आत्ता परिस्थिती याउलट निर्माण झाली. मुलाचे वडील मुलीच्या घराचे उंबरठे झिजवत आहेत. 💒 लग्नाचा खर्च आम्ही उचलतो, अशी शाश्वती देत आहेत. स्त्रीभ्रूणहत्येमूळे स्त्रीयांची कमी झालेली संख्या यामुळे काही राज्यांत स्त्रियांची खरेदीविक्री होत आहे. मध्यंतरी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील जाळे खणून काढले होते. मुलींच्या कमी होणा-या संख्येमुळे बहुपतीत्व पद्धती काही राज्यांत (उत्तर प्रदेश, राजस्थान) रुढ होत आहे. तिन-चार भावांमध्ये एक स्त्री पत्नी म्हणून स्वीकार करावा लागत आहे. यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नैतिक मूल्यांची घसरण वाढतं आहे. यातून बालविवाह वाढण्याची भीती आहे. स्त्री संख्या कमी झाल्याने एक दिवस स्त्रीचाच विनाश होईल, ज्याने मानवाचे पृथ्वीवरील भविष्यच धोक्यात येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. स्त्रिभ्रुणहत्या रोखण्याची जेवढी जबाबदारी शासनाची, त्यापेक्षा प्रत्येकाची जास्त आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. फक्त कायदे करून चालणार नाही तर त्याची परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे. मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी वंशाची पणती ही धारणा समाजात बिंबवणे गरजेचे आहे. तिच्या जन्माचे जल्लोषात स्वागत झाले पाहिजे. त्या कळ्यांनाही उमलण्याचा पूर्ण अधिकार आहे.




डॉ.गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय