भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक

 भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक

        भ्रष्टाचार ही भारतीय व्यवस्थेला लागलेली किड आहे. प्रत्येक नागरिकाचा भ्रष्टाचाराशी कुठे ना कुठे संबंध येतोच. सर्वच क्षेत्रात त्याची पाळेमुळे रूजलेली आहेत. हा एक समाजस्पर्शी विषय आहे. तो सर्वाचार झाला आहे. सर्व सामान्यांच्या भावना या बाबतीत बोथट झाल्या आहेत. सरकार दप्तरी असलेले आपले कोणतेही काम चिरीमिरी दिल्याशिवाय पुर्ण होतच नाही. नसता फाईल अपूर्ण आहे असा शेरा मारून फाईल उलटा प्रवास करते. काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या 🏠 घरातून करोडो रूपयांच्या नोटा, किलोने सोने, नांवावर कोट्यावधींच्या जमिनी, फ्लॅट, अनेक एकरांवर पसरलेले विस्तीर्ण फार्म हाऊस, महागडे बंगले, जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या नावाने प्रोपर्टी इन्कमटॅक्सच्या किंवा ईडी च्या धाडीत सापडलेल्या आहेत. ह्या झाल्या सापडलेल्या, मग न सापडलेल्या किती असतील याची कल्पना न केलेली बरी. हा सर्वसामान्याच्या उदासिनतेचा परिपाक आहे. आपल्याला काय त्याचे? काम लवकर करायचे असेल तर द्यावेच लागतात अशी सर्वसामान्य जनतेची वाक्ये सहज 👂 कानी पडतात. सरकारी अधिकाऱ्यांची स्वार्थी वृत्ती दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराचा ओघ प्रचंड गतीने वाढत आहे. जन्म-मृत्यूची नोंदी पासून याची सुरुवात होते. तलाठ्याला जमिनीचा किंवा शेतीचा ७/१२ चार फेर आढायचा असेल तर काहीतरी देवाणघेवाण करावीच लागते. अवैध वाळू उपसा कशाचे द्योतक आहे? कोणत्या आरटीओ कार्यालयात विना एजंटचे काम होते, हे आपणच सांगा. जो नियमाप्रमाणे काम करतो, त्यालाच लोकं सरळसरळ 'वेडा' म्हणतात. म्हणजे जनतेतूनच याला खतपाणी घातल्या जाते. सरकारी खात्यात ठराविक ठिकाणी पोस्टींग मिळवण्यासाठी मोठ्या रक्कमेचा व्यवहार झाल्याचे ऐकिवात आहे. मग हे दिलेले पैसे कसे जमा होतील याचाच तो विचार करणार.भ्रष्टाचाराला कुठलाही प्रांत, कोणतीही भाषा, कोणतीही जात, कोणताही धर्माचे बंधन नाही. म्हणजे तो सर्वव्यापी आहे. सत्तेत असेल त्याने भ्रष्टाचार करायचा, विरोधी पक्षाने त्या विरोधात आकाशपाताळ एक करायचे. कालांतराने विरोधी पक्षाला सत्ता मिळाल्यास पुन्हा त्याने भ्रष्टाचार करायचा. हे आलटून पालटून सत्तेत येणार. पुन्हा तेच. आज ईडीने सर्व पक्षीय पुढा-यांच्या 🏡 घरी धाडी टाकल्या तर किती बेनामी रक्कमा गोळा होतील, याची आपण कल्पना करू शकणार नाही. 

          भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनतो की काय ही शंका येत आहे. कारण त्यांचा विरोध करण्याऐवजी आपण त्याचा सन्मान करीत आहोत. त्यांची विदारकता म्हणजे त्यास मिळत असलेली लोकमान्यता. आता तो भिऊन भिऊन करण्यासारखा, बाजूला करण्यासारखा, टेबलाखालून घेण्या पुरता प्रकार राहिला नाही, तर प्रतिष्ठेचे लक्षण बनला आहे. एखादा अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच किंवा तत्सम पदाधिकाऱ्याने त्याच्या कार्यकाळात काही अवांतर माया गोळा केली नाही तर लोकं त्याला सरळ मुर्खात काढतात. त्याला आपल्या कारकीर्दीत काहीच कमावता आले नाही, असा उपरोधिक टोला लगावतात. म्हणजे चांगुलपणा चूकीचा आहे की काय अशी धारणा होते. एखाद्या गुत्तेदाराने रस्त्याचे टेंडर घेतले तर टक्केवारी देता देता त्याच्या 👃 नाकी नऊ येतात. रस्ता करुन त्याच्याकडे काही रक्कम उरावी ही अपेक्षा बाळगली तर रस्त्याचा दर्जा कसा असेल याची आपण कल्पनाच न केलेली बरी. तो थांबवण्यासाठी अनेक कायदे आहेत. मात्र याच्यापुढे ते तोकडे पडतात. पोलिस, सी.बी.आय, सी.व्ही.सी., अँटी करप्शन ब्यूरो अशा यंत्रणा आहेत. फौजदारी न्यायालय आहे. तरीही भ्रष्टाचाराचा राक्षस थांबायचे नावच घेत नाही. न्यायालयातून ९४% लोक निर्दोष मुक्त होतात, त्यामुळे याबाबतीत धारिष्ट्य बळावत आहे. यातील खटले चालविण्यासाठी खूप दिरंगाई होते, खटला प्रत्यक्ष पुराव्याला येईपर्यंत साक्षीदार साक्ष विसरतात, फिरतात किंवा मरतात. काही साक्षीदार आरोपीच्या धाकाला घाबरतात व साक्ष देताना विरोधाभासी उत्तरे देतात. याचा फायदा आरोपीला होतो. त्यामुळे कायद्याची भिंती वाटण्याचे कारणच नाही. भ्रष्टाचार लोकांच्या अंगवळणी पडला आहे. लोकांना त्याचा राग वाटतच नाही. सर्वसामान्य जनता ही भ्रष्टाचारी प्रवृत्तीची नसते. भ्रष्टाचार निर्मूलन हा वरवरचा उपाय नाही. भ्रष्टाचारी वृत्तीची पुरेपूर जाणीव जनतेला झाल्याशिवाय भ्रष्टाचार नाहीसा होणार नाही.

          भ्रष्टाचाराविरोधात बोलायला कोणी तयार नाही. कोणाला त्याचा संताप येईल असे वाटत नाही. एका सर्वेनुसार ९०% युवक लाच द्यायला व पटापट कामे करून घ्यायची तयारी दर्शवतात. ६०% युवक तर लाच द्यायची तयारी दाखवतात. या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघतो की, नवीन पिढी सुद्धा त्याला अनुकूल आहे. लाच घेणारे सूद्धा लाच घेतात. 'सर्व्हे ऑफ मिडिया स्टडीज' नुसार ४०% पेक्षा जास्त कर्मचारी आपले काम करून घेण्यासाठी खात्या बाहेरील अन्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना लाच देतात. केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष एन. विठ्ठल सांगतात की, भारतीय भ्रष्टाचाराचे मूळ राजकीय भ्रष्टाचारात आहे. भ्रष्टाचाराची जाणीव होणं ही प्राथमिक बाब. तो भ्रष्टाचार उघड्या डोळ्यांनी पाहणं ही निष्क्रीयता आणि भ्रष्टाचाराचे भयानक परिणाम माहीत होऊनही कोणतीही कृती न करणे म्हणजे देशद्रोहच ठरतो. लोकांच्या मनात त्याच्या विषयी तिटकारा निर्माण झाला पाहिजे. त्याचे समूळ उच्चाटन व्हावे अशी जेंव्हा जनभावना तयार होईल, त्या दिवशी भ्रष्टाचार संपवायला कोणत्याही कायद्याची गरजच भासणार नाही.


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय