लोकसंख्येचा भस्मासुर
लोकसंख्येचा भस्मासुर
जगात लोकसंख्येत एक नंबरवर असलेल्या चिन ला पाठीमागे टाकण्याचा आणि जगात लोकसंख्येत एक नंबर मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. १४४ कोटी च्या पुढे लोकसंख्या गेलेली आहे. पृथ्वीतलावर साधारणपणे पाच लाख वर्षांपासून मानवी जीवन अस्तित्वात आहे. या कालखंडात जगातील लोकसंख्येत अनेक चढउतार झाले. काही वेळा ती कमीसुद्धा झाली. नव पाषाण युगापासून ते इ.स.१९५० पर्यंत जगाची लोकसंख्या संथगतीने वाढत होती. साथीचे महाभयंकर रोगाने मोठ्या संख्येने मनुष्यहानी व्हायची. युद्ध, दुष्काळ, महापूर, भुकंप, यांसारख्या अनेक बाबींमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असे. त्यामुळे लोकसंख्यावाढ ही समस्या होवू शकते हे मान्यच नव्हते. लोकसंख्यावाढ ही जटील समस्या भारता समोर आ वासून उभी आहे. जगाच्या लोकसंख्येच्या १७.५% भारताची लोकसंख्या आहे. परंतू भूभागाचा विचार केला तर जगाच्या केवळ २.४% भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. जानेवारी २०११ मधील एका अहवालानुसार भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलं जन्माला येतात. त्यापैकी ११ मुलं तर उत्तरप्रदेशातच जन्माला येतात, जे प्रमाण नायजेरियातील जन्मदराच्या बरोबरीचे आहे. पाकिस्तानात प्रति मिनिटाला ९ मुलं तर बांगलादेशात प्रति मिनिटाला ७ मुलं जन्माला येतात. भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणा-या लोकसंख्येचा विचार करता बेकारी, महागाई, गरिबी सारख्या ज्वलंत समस्यांना सामोरे जावे लागेल.
- लोकसंख्या वाढीची कारणे:-
१) धर्म: - मुलं ही ईश्वराची देणगी असतात असा सर्वच धर्माचा समज आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढण्यास मदत होते.
२) सामाजिक रूढी परंपरा:- हिंदू धर्मात मोक्षप्राप्ती साठी मुलगाच हवा असा अट्टाहास तर मुस्लिम धर्मात अल्लाहची देणगी म्हणून मुलं जन्माला घातली जातात. काही कुटूंबात तर मुलगा व्हावा या अपेक्षेने सात-आठ अपत्ये जन्माला घातली जातात.'ज्याने चोच दिली तो दाणा सुद्धा देईल' अशी धारणा बळावते. काही तथाकथित स्वयंघोषित धर्मगुरू सुद्धा अधिकाधिक मुलं जन्माला घाला असे आवाहन करीत आहेत, जे दुर्दैवी आहे.
३) निरक्षरता:- निरक्षरतेचा जन्मदराशी घनिष्ठ संबंध आहे. जेवढे उच्च शिक्षित कुटुंब तेवढी प्रगल्भता त्यांच्याकडे असते. चांगले काय किंवा वाईट काय यातील सारासार विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने जन्मदर आटोक्यात राहतो. याउलट निरक्षर कुटूंबातील मुलांची संख्या मोठी असते. पुरुष प्रधान संस्कृतीमूळे स्त्रीया स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकत नसल्याने सुद्धा लोकसंख्या वाढीस मदत होते.
४) दारिद्र्य:- दारिद्र्यामूळे लोकांना पोटभर खायला मिळत नाही. मनोरंजनाची साधने उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढून लोकसंख्यावाढीत भर पडते.
५) संतती नियमन विषयक अज्ञान:- संतती नियमन विषयक साधनांच्या माहितीचा अभाव, किंवा माहिती असूनही त्याचा वापर न करणे, यामुळे लोकसंख्यावाढीस सहाय्यक ठरते.
६) एकत्र कुटुंब पद्धती:- एकत्र कुटूंब पद्धतीत खर्चाचा भार कोणत्याही एकावर नसल्याने परिणाम काय होतील याची तमा नसल्याने लोकसंख्येत वाढ होते.
७) कष्टाचे व्यवसाय करणारे:- जे लोक अतिशय कष्ट करतात, त्यांच्यात जनन प्रमाण जास्त असते. मजूर, बांधकाम करणारे, वीटभट्टी कामगार, शेती अशी अतिकष्टाची कामे करणारी मंडळी यांच्या कुटूंबात जन्मदर जास्त असतो.
८) आर्थिक स्थिती:- ज्या प्रमाणात दरडोई उत्पन्न जास्त असेल तर तेथे जन्मदर कमी असतो, तर ज्या लोकांचा आर्थिक स्तर कमी असतो तेथे प्रजनन दर जास्त प्रमाणात आढळतो.
९) विवाह वय:- कमी वयात विवाह झाल्यास प्रजनन क्षमता जास्त असते. याउलट जास्तीच्या वयात विवाह केला असता प्रजनन क्षमता कमी आढळते. आजही अल्पवयीन विवाह होत असल्याने लोकसंख्या वाढविण्यात सहाय्यभूत ठरते.
१०) वैज्ञानिक प्रगती:- विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने सर्वच क्षेत्रात फार मोठी झेप घेतली आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक व्याधींवर उपचार निघाले आहेत. तसे पाहता हे सकारात्मक पाऊल आहे. मात्र लोकसंख्या वाढीस त्याने हातभार लावला आहे.
११) सामाजिक परिस्थिती:- एक श्रीमंत एका श्रीमंताला जन्म देतो, तर एक गरीब दहा गरिबांना जन्म घालतो. ही सर्व गोळा-बेरीज संपूर्ण समाजातील गरीबी वाढवण्यात आणि लोकसंख्या वाढविण्यात कारणीभूत ठरते.
- लोकसंख्या वाढीची समस्या:-
घटता मृत्यूदर आणि वाढता जन्मदर हे प्रगतीचे द्योतक असले तरी लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अन्नधान्याचा तुटवडा, अपुरा निवारा, जंगलतोड - त्यामुळे पर्जन्यमान कमी, स्थलांतर, साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, दळणवळण-शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव, बेसुमार झोपडपट्ट्या, नैतिकतेचे अध:पतन, आर्थिकदृष्ट्या जनतेचे जीवनमान खालावणे, गर्दीची समस्या, प्रदुषणाची समस्या, ताण-तणाव, दहशतवाद अशा असंख्य समस्या निर्माण होत आहेत. तज्ञांच्या मते आणखी पुढील ४० वर्षे भारतीय लोकसंख्या वाढत राहील.
- उपाययोजना:-
आत्मसंयम किंवा ब्रम्हचर्य पालन महत्वाचे आहे. महात्मा गांधींनी कुटूंब नियोजनासाठी हा मार्ग सुचवला आहे. ज्या काळात गर्भधारणा होते, त्याकाळात संभोग टाळावा. मासिकपाळीच्या कालावधीचा यात विचार करावा. कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. कुटूंब नियोजनाचाच एक भाग म्हणून कॉपर टी चार वापर करावा. कुटूंब नियोजन साधनांचा वापर करावा. गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा परिणामकारक आहेत.विवाहाचे वय वाढवणे गरजेचे आहे. शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे.
- बलस्थाने:-
वाढती लोकसंख्या जरी अनेक बाबतीत धोकादायक असली तरी त्यातही काही बलस्थाने दिसून येतात. UNFPA च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या भारतात आहे. भारतातील तरूण लोकसंख्या नॉलेज व नेटवर्क गुड्स सर्वांत मोठी ग्राहक असेल. शिवाय कामगारांच्या रूपाने ती पुढे येईल. जगातील बौद्धिक संपत्तीत भारतीयांचा वाटा निश्चितच मोठा राहील. चिनमध्ये वृद्धांची संख्या भारतापेक्षा दुप्पट आहे. चीन ने 'एकच मुल' हे धोरण स्वीकारले आहे. भारतात 'हम दो हमारे दो' ही फक्त घोषणा आहे, सक्ती नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणणे हे आव्हान असले तरी अशक्य नाही. आपल्या देशातील मनुष्यबळ हे बहुआयामी आहे, म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यातून त्याला मागणी आहे.अमेरिका आणि प्रगत देशांना भारतातून ब्रेन्स मिळतात. आशियाई देशांना स्किल असलेली माणसं आपल्या कडूनच मिळतात. गल्फ कंट्रीज ला आपल्या देशातून मेहनती लोकं मिळतात. मात्र त्यासाठी लोकसंख्या नियंत्रीत करणे आवश्यक आहे.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment