जेनेरिक औषधे
जेनेरिक औषधे
जेनेरिक औषधे म्हणजे ब्रॅन्डेड नेसलेली, स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषधांच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नाही. प्रिस्क्रिप्शन लिहून देणारे डॉक्टर जेनेरिक औषधे पेशंटला लिहून देत नाहीत. मेडिकल स्टोअर्स वाले जेनेरिक औषधे ठेवत नाहीत. त्यामुळे स्वस्त असूनही जेनेरिक औषधे सर्वसामान्यांपासून दूर आहेत. आपण जेनेरिक औषधांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
मानवाच्या जन्माअगोदर पासून ते मृत्यू पर्यंत औषधाचा अतिशय जवळचा संबंध आहे. औषधं हा अन्न, वस्त्र, निवारा सारखाच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. देशात, जगात औषधी न वापरणारा मनुष्य सापडले दुर्मिळ आहे. मानवा बरोबरच पाळीव प्राण्यांच्या जीवनाची वाटचाल सुद्धा औषधांकडे केंव्हाच पोहोचली आहे. साध्या सर्दी, खोकला, ताप पासून ते अतिशय कठीण शस्त्रक्रियेसाठी औषधी लागतेच. पुर्वी 🌲 झाड- पाला, वनस्पती, कंदमुळे, वेली, त्यापासून मिळणारे रस अशा विविध बाबी औषधी म्हणूनच वापरल्या जात. 'आजीबाईचा बटवा' हा अत्यंत गुणकारी आणि प्रसिद्ध होता. जसं विज्ञान प्रगत होत गेले, त्याप्रमाणे औषधांचे स्वरूप बदलले. अभ्यास आणि संशोधनानंतर औषधे केमिकल स्वरूपात तयार केली जावू लागली. मार्केट मध्ये दोन प्रकारची औषधे विकली जातात. एकाला 'पेटंट' (फार्मास्युटिकल)/ (ब्रँडेड) तर दुस-याला 'जेनेरिक' औषधे म्हणतात. पेटंट स्वरूपाच्या औषधांचा जाहिरातीवर एवढा भडीमार आहे की ती आपल्या जवळची वाटतात. पेटंट स्वरूपाच्या औषधांच्या प्रसिद्धी आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यामुळे ती महागडी असूनही आपण वापरतो. शिवाय औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याचे काम 'डॉक्टर' करतात. ते पेटंट स्वरूपाची औषधे लिहून देतात, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पेशंट औषधे वापरतात. मात्र दुसऱ्या प्रकारची जी जेनेरिक औषधे आहेत, ती पेटंट स्वरूपातील औषधांच्या ३० ते ८० टक्क्यांनी स्वस्त आहेत. जेनेरिक औषधे हे महागड्या औषधांसाठी वापरलेला पर्याय आहे. जगाची महाशक्ती म्हणून ओळखली जाणा-या अमेरिकेत ९०% जेनेरिक औषधे वापरली जातात. डोस फोर्म, सामर्थ्य, गुणवत्ता आणि कार्यप्रदर्शन यात असते. जेनेरिक औषधे ही पेटंट औषधांप्रमाणेच कार्य करतात आणि लाभ सुद्धा सारखेच आहेत. म्हणजे दोन्ही औषधांचा दर्जा सारखाच असतो. जेनेरिक औषधे गुणवत्तापूर्ण असतात. पेशंटला ती योग्य दरात मिळू शकतात. याउलट पेटंट किंवा ब्रँडेड औषधांचे उत्पादन ड्रग्स कंपन्यांकडून होते आणि विक्री दुसऱ्याच कंपनीच्या नविन ब्रँडखाली केली जाते.
जेनेरिक औषधे काय आहेतः-
कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी सर्व प्रकारचे संशोधन आणि अभ्यासानंतर एक रसायन तयार केली जाते. शास्त्रीय भाषेत त्याला सॉल्ट (मीठ) म्हणतात. हे रसायन सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावे यासाठी त्याला औषधाचे स्वरूप दिले जाते. सर्वसामान्यपणे अशी रसायने अत्यंत महागडी असतात. परंतू ते जेनेरिक नावाच्या सॉल्टची रचना आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन तयार केले जाते. हे तज्ञांची समिती आणि अनेक स्तरांच्या चाचणीनंतर तयार केले जाते, त्यामुळे ही औषधे खूप स्वस्त असतात. जेनेरिक औषधे म्हणजे औषधांचा असा गट ज्यामधील रासायनिक, औषधशास्त्रीय प्रमाणित संयुगांच्या संशोधनावरील खर्च कंपनीने पूर्वीच भरपूर नफ्यासह मिळवलेला असल्यामुळे फक्त औषध निर्मितीच्या उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत ठरविण्यात येते. तसेच या औषधांना विशिष्ट ब्रँड नेम नसते. केवळ त्यामधील घटकांच्या नावावरून ते औषध ओळखले जाते. त्यांना ब्रँड नेम नसल्यामुळे वैद्यकीय प्रतिनिधी (एम.आर.) नेमून प्रचार करण्याचा खर्च सुद्धा वाचतो.
स्वस्त कसे:-
जेनेरिक औषधे स्वस्त असण्याचे कारण म्हणजे याच्या किमती निश्चित करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन केली जाते. तर पेटंट स्वरूपाच्या औषधांच्या किमती औषध कंपन्या मनमानी पद्धतीने ठरवतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या एका अहवालानुसार जगभरातील डॉक्टरांनी जेनेरिक औषधांची प्रिस्क्रिप्शन लिहून दिले तर विकसित देशातील आरोग्यावरील खर्चामध्ये 70 टक्के आणि विकसनशील देशांमध्ये आरोग्यावरील खर्च यापेक्षाही कमी होऊ शकते. जेनेरिक औषधे स्वस्त असण्याचे कारण म्हणजे हे निर्माण करणा-या कंपन्यांना महागड्या क्लिनिकल ट्रायल्स मधून जावे लागत नाही. कोणत्याही स्वरुपाची जाहिरातबाजी करावी लागत नाही. त्यामुळे जाहिरातीवरिल मोठा खर्च वाचतो. अनेक कंपन्या एकच जेनेरिक औषध तयार करतात, पर्यायी त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवून कमीत कमी किंमतीत विकतात. उदाहरणादाखल डायबिटीस पेशंटला दिवसभरात चार प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पैकी सकाळची 'टेमन्स ४०' च्या दहा गोळ्यांची स्ट्रिप ३२ रुपयात मिळते. मात्र जेनेरिक असलेल्या याच गोळ्या 'टेल्मीसर्टन ४०' या नावाने फक्त १२.५० रूपयात मिळतात. कॅन्सरच्या एका पेशंटला महिन्याभरात ब्रँडेड औषधे एक लाख २५ हजार रुपयाची होतात तर तिच जेनेरिक औषधे आठ ते दहा हजार रुपयात मिळतात. कोरोना काळात सर्वाधिक वापरले गेलेले 'हायड्रोक्लोरोक्विन' किंवा 'रेमडेसिव्हर' हे जेनेरिक आहेत. कोविड-१९ काळात एक हजार रूपयांचे रेमडेसिव्हर अगदी तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यत काळ्या बाजारात विकल्याचे चर्चा आपणास ऐकावयास मिळाली आहे.
शासकीय पातळीवर प्रयत्न:-
जेनेरिक औषधांच्या प्रसारासाठी शासकीय पातळीवरून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने २००८ मध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ६३० जिल्ह्यात जनऔषधी केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. २०१६-१७ मध्ये केंद्राने जनऔषधी योजनेसाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद केली. अनेक सवलती देण्यात आल्या. एप्रिल-२०१७ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने जेनेरिक औषधे लिहिण्याबाबत डॉक्टरांना सक्ती केली. प्रिस्क्रिप्शन लिहिताना डॉक्टरांनी औषध कंपनीचे नाव लिहून न देता फक्त जेनेरिक नांव सुवाच्य अक्षरात लिहून द्यावे असे निर्देश दिले. मात्र ही सक्ती कागदावरच राहिली. औषधाची किंमत कमी म्हणजे विक्रेत्याला नफा सूद्धा कमीच मिळतो. शिवाय कमिशन मुळेही औषध कंपन्या आणि औषध विक्रेत्यांना जेनेरिक औषध व्यवसायात रूची वाटली नाही. जगात औषध निर्मिती क्षेत्रात भारत १७ व्या क्रमांकात आहे. कोविड-१९ मध्ये तर भारताने १२७ देशांना औषधांचा पुरवठा केला. कोविड व्हॅक्सिनेशनची विक्रमी निर्यात केली.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा इशारा:-
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कौन्सिल) पेशंटला जेनेरिक औषधे लिहून देणे (प्रिस्क्रिप्शन) सर्व डॉक्टरांना बंधनकारक केले आहे. शिवाय औषधांच्या ब्रँडचा उल्लेख प्रिस्क्रीप्शन वर करण्यास मनाई करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कार्यवाही संबंधित डॉक्टर अथवा रुग्णालयांचा वैद्यकीय परवाना ठराविक काळासाठी रद्द केला जाणार आहे. एमसीआयने २ ऑगस्ट २०२३ रोजी याबाबतची अधिसूचना जाहीर केली. डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून दिल्यास आरोग्यावर होणारा खर्च कमी होईल.
याचे पालन सर्व सामान्य भारतीयांच्या हिताचेच ठरेल. याची अंमलबजावणी कशी होते यावरच जेनेरिक औषधांचे भवितव्य अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधापेक्षा कमी नसते. दोन्ही औषधांमध्ये एपीआय (ॲक्टिव्ह फार्मास्युटीकल इनग्रेडियन्ट) अर्थात मूळ रासायनिक घटक सारखेच असतात. त्यामुळे आजाराच्या निवारणासाठी त्यांचे परिणाम सारखेच असतात. स्वस्त ते चांगले असेलच की नाही ही जनभावना जेनेरिक च्या न होणाऱ्या प्रसारास कारणीभूत ठरली. 'महाग असेल तर ते चांगले असते' ही वृत्ती सोडून द्यावी लागेल. रिझल्ट सारखा असेल आणि अतिशय स्वस्तात असेल तर जेनेरिक औषधे वापरायला काहीच हरकत नसावी. गरज आहे ती जनजागृतीची. असे झाले तर औषधांवरचा खर्च फार कमी होईल.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment