'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम
'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम
भारतीय हे जगातील संपन्न राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अंतराळ क्षेत्रातही देशाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सुर्याचे पृथ्वी पासूनचे अंतर १४ कोटी ९६ लाख किलोमीटर असून सूर्याच्या प्रमंडळाचा अभ्यास करणारे यान 'आदित्य एल-वन' ची तयारी सुरू आहे. भारतीय अंतराळवीर भारतीय यानातून अवकाशात पाठविण्यासाठी 'गगनयान' पाठवण्याची योजना सुरू आहे. मंगळ ग्रहावर मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणून 'मंगळयान-२' पाठवले जाणार आहे. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 'शुक्रयान' पाठवण्याची तयारी सुरू आहे. अवकाशातून पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी एक वेधशाळा ज्याचे नाव 'निसार' असून नासा-इस्त्रो-सिंथेटिक अपर्चर रडार झेपण्याच्या तयारीत आहे. अशा अनेक मोहिमा जगात भारताचे स्थान भक्कम करण्यासाठी तयार आहेत. देशाने 🌙 'चंद्रयान-३ LVM-3 M4' हे यान १४ जूलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चंद्र 🌙 ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. त्याविषयी माहिती जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच आहे.
चंद्रयान-१ आणि चंद्रयान-२ च्या अयशस्वीतेनंतर चंद्रयान-३ ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्रयान-१ ने चंद्रावरील पृष्ठभागावर असलेल्या पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर चंद्रयान-२ हे चंद्राभोवती असलेल्या वातावरणाची माहिती गोळा करण्यासाठी पाठवले होते. चंद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागाजवळ २०० मीटर वर असताना चंद्राच्या पृष्ठभागाला धडकले. मात्र चंद्रयान-३ मध्ये याबाबतची सर्व काळजी शास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. चंद्रावर यान पाठवणाऱ्या देशांच्या यादीत चीन, रशिया आणि अमेरिकेनंतर भारत हा चौथा देश ठरलेला आहे. पृथ्वी पासून चंद्राचे अंतर तीन लाख ८४ हजार किलोमीटर आहे. भारत गुणवंतांची खाण आहे.१५ ऑगस्ट १९६९ या दिवशी कर्नाटक मधील बेंगळुरू येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो)स्थापना झाली. आपले शास्त्रज्ञ म्हणजे आधुनिक काळातील ऋषीच आहेत. या मोहिमेसाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. इस्त्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ चे यशस्वी भरारी घेतली. अमेरिकेला हीच मोहिमा आखायला दहा हजार कोटींचा खर्च आला. तर रशियाने चार हजार सहाशे कोटीत ती पूर्ण केली. एकतीसशे कोटी रुपयात चीन ने तो पल्ला गाठला. भारतीय शास्त्रज्ञ मात्र अतिशय काटकसरीने म्हणजेच अवघ्या ९०० कोटी रुपयात ही मोहीम पूर्ण करणार आहेत. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरत त्यांनी फक्त ६१५ कोटी रुपये यासाठी वापरले आहेत. आपल्याकडे एखाद्या चित्रपटावर एवढा खर्च केला जातो. चंद्रयान-३ ला एलव्हिएम ३ हे इस्त्रो चे प्रक्षेपण यान जोडले आहे. या यानाची उंची ४३.५० मीटर असून त्याचे वजन ४६० टन आहे. हे प्रक्षेपण यान आठ हजार किलो ग्रॅम वजन पेलण्यास सक्षम आहे. हे यान २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारतीयांसह सर्व जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर (दक्षिण ध्रुवाजवळ) उतरवण्याचा आपल्या शास्त्रज्ञाचा प्रयत्न आहे. या दक्षिण भागात अद्याप जगातील कोणतेच यान उतरलेले नाही. या ठिकाणी गडद अंधार असून सुर्यप्रकाशाचा पत्ता नाही. तेथील तापमान -२३० डिग्री आहे. दक्षिण भागात हे उतरवण्याचा उद्देश म्हणजे इथं पाणी आणि इतर खनिजे असण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण ध्रुवाकडे जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे चंद्रावर खरच पाण्याचा विपुल साठा असेल तर तिथून चंद्रा पलीकडच्या अंतराळ मोहिमांसाठी एक बेस तयार करता येईल, पाण्यातल्या हाड्रोजनला इंधनरूपात वापरता येईल, अशी आशा अंतराळ संशोधकांना आहे.
चंद्रयान-३ चे उद्देश:-
- लॅन्डरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवणे.
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे.
- रोव्हर वापरून त्याचे कलाकृती शोधणे.
- तेथील परिस्थितीचा अभ्यास करणे.
- रोव्हर (🤖 रोबो) चंद्राच्या भागात कोणती खनिजे आहेत, पाणी याचा शोध घेईल.
- चंद्रयान-३ च्या लॅन्डर मधील चार पेलोड हे चंद्रावर येणारे भूकंप, पृष्ठभागाची थर्मल प्रॉपर्टी, प्लाझ्मा आणि चंद्राचे पृथ्वी पासूनचे अचूक अंतर ओळखेल.
- भविष्यात चंद्रावर कधी वसाहती स्थापन करावयाच्या असतील याकामी उपयुक्त ठरणार आहे.
आव्हाने:-
चंद्रावर जीपीएस काम करीत नाही. हे यान मानव विरहित असल्याने ते पुर्णपणे संगणकाद्वारे नियंत्रित आहे. ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावरून नियंत्रण ठेवणे कठीण आहे. ते पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं कार्य करते. चंद्रावर गुरूत्वाकर्षण नसल्याने यान उतरताना काळजी घ्यावी लागेल. चंद्रावर सुर्यप्रकाश असताना सॉफ्ट लँडिंग होईल. पृथ्वीवरील १५ दिवसांचा चंद्रावर एक दिवस आहे. लॅन्डर आणि रोव्हर चंद्रावर पुर्ण दिवस घालवतील. उतरताना त्याची गती अतिशय कमी असते. सध्या चंद्रावर भारताचे यान तर आहेच, सोबतच चंद्राभोवती इतर आणखी सहा चांद्रयाने परिभ्रमण करीत आहेत. त्यामुळे चंद्राच्या कक्षेतील वाहतुकीत भर पडण्याची शक्यता आहे. चंद्रमोहीमाच्या वाढत्या संख्येमुळे संशोधन आणि शोधासाठी शास्त्रज्ञाच्या दृष्टीने चंद्र हा केंद्रबिंदू ठरत आहे. चंद्राकडील वाहतूक वाढल्याने यानांची टक्कर होण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी योग्य समन्वय आणि व्यवस्थापन याचे मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे.
मात्र यावेळी या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. भारताची २०२५ मध्ये चंद्रावर प्रत्यक्ष मानवास पाठवण्याची तयारी सुरू आहे.
डॉ.गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment