झळा दुष्काळाच्या

 झळा दुष्काळाच्या 

        आपण भाग्यवान आहोत, दुष्काळाच्या झळा जाणवत नाहीत. आपल्या पिढीने दुष्काळ अनुभवला नाही. मात्र ज्यांचे वय साठपेक्षा जास्त आहे, त्यांनी १९७२ चा महाभयंकर दुष्काळ अनुभवला आहे. आज पिण्यास पाणी मुबलक आहे. हरितक्रांती झाल्याने अन्नधान्य भरपूर आहे. आपण ३०% अन्नाची नासाडी करतो. भुक आहे तेवढेच ताटात घेतले पाहिजे. सर्व असताना त्याची किंमत आपल्याला करता येत नाही. दुष्काळ काय असतो, त्याची तीव्रता किती होती यावरून निश्चित बोध घेता येईल.

        दोन वर्षात पाऊस कमीच झाला.तिस-या वर्षी १९७२ मध्ये परिस्थितीच पालटली. कोरड्या दुष्काळामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. साधारणपणे वर्षभर पुरेल इतका धान्याचा साठा सर्वांकडे असायचा. मात्र दोन वर्षातील कमी पावसाने ती संधी सुद्धा हिरावून घेतली. शेतातील उभं पिक जळून गेल होतं. प्यायला पाणी नाही की खायला अन्न नाही अशी अन्नान दशा झाली. माणसांनाच खायला नाही म्हटल्यावर जनावरे कशी जगवायची, असा यक्ष प्रश्न होता. अन्न पाण्यावाचून गोठ्यातील जनावरे पटापटा मरून जात होती. दुष्काळाची दाहकताच इतकी भयानक होती की, जनावरांना चारा नसल्याने गायी, म्हशी, बैल अशा मुक्या जनावरांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येत होते. तरीही त्यांना कुठेतरी डोंगरद-यात सोडून देण्याशिवाय पर्याय नव्हता. फक्त त्यांना वाचा नव्हती. नाही तर ते म्हणाले असते मालकं तुमच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे ‌ आमच्या नशिबावर आम्हाला सोडून द्या. आम्ही आमच्या पद्धतीने जगू. आपण मात्र सुखी राहा. तुमचं जगणं महत्वाचे आहे.

        वेळ खूप कठीण होती. प्यायला पाणीच नव्हते. कसलेही मिळेल ते पाणी पिण्याची तयारी होती. पाणी कितीही गढूळ असले तरी चालेल, ते कपड्याने गाळून प्यावे लागत होते.कितीही मोठा जमिनदार असला तरी दुष्काळाने त्याला रस्त्यावर आणले होते. ९५% जनतेला याच्या झळा जाणवल्या. कोणाच्याच घरात एकवेळचे सुद्धा अन्न नव्हते. बारा बलुतेदार ते गावचा मुखीया असलेल्या पाटलाला सुद्धा यांची झळ बसलेली होती. प्रत्येकजण पाण्याच्या टँकर ची आतुरतेने वाट पहात होता. अन्न पाण्यावाचून मरणारांची संख्या वाढत होती. लोकांकडे धान्यच शिल्लक नव्हते. धान्याची सरकारी गोदामे रिती झाली होती.अशा बिकट परिस्थितीत परदेशातून धान्याची आयात करावी लागली. धान्य तरी कोणते तर ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. रित्या पोटाची खळगी भरणे आवश्यक होते. दुष्काळात जगण्यासाठी लाल रंगाचे 'मिलो' हे धान्य अमेरिकेकडून आयात करावे लागले. 'मिलो' हे अमेरिकेत डुकरांना खाऊ घालायचे अन्न होते. भुकेच्या पोटातील आगीमुळे नाईलाजाने ते खावे लागले. कधी कधी तर जीवन संपवावे, असे वाटायचे. दुष्काळात कामावर गेल्यावर १.५० रू‌ रोज पडायचा. अर्धवट दळलेले गहू/मका, गुळ, त्यात थोडे तेल अशा सर्वांचे मिश्रण असलेल्या 'सुकडी' ने तेंव्हा तारले. मक्याच्या पिवळ्या भाकरी खाऊन सुद्धा अनेकांनी दिवस काढले. आपल्याकडे ज्याला जनावरं तोंड सुद्धा लावत नाहीत, तो 'बरबडा' लोकांना खावा लागला. त्याच्या भाकरीने अनेक माणसं जगू शकली. मुळात 'बरबडा' हे गवत होते.

        खिशात पैसे नव्हते, बाजारात धान्य सूद्धा नव्हते. खपाटीला गेलेली पोटं, छातीच्या उघड्या बरगड्या दिसणारी निस्तेज झालेली माणसं दिसतं होती. तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तोकडा पडत होता. पुरोगामी महाराष्ट्राने वि.स.पागे या अधिका-याच्या मदतीने या काळात अतिशय नाविण्यपूर्ण योजना सुरू केली. ती होती 'रोजगार हमी योजना '. देशात ही योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. गावातील किमान पन्नास लोकांनी रोजगाराची मागणी केली की, सार्वजनिक काम सुरू केले जाई. अन्यथा भत्ता देण्याची तरतूद यात होती. पाझर तलाव, नाला बंडींग, छोटे बंधारे, सामुदायिक विहीरी खोदणे, जून्या विहीरी-बारवं दुरूस्त करणे, रस्ते तयार करणे, लघू पाटबंधारे तलाव यासारखे हाताला काम देणारे कामे सुरू करण्यात आली. रेशन मार्फत धान्याचा पुरवठा केला जाई. लोक आशेने रेशनची वाट पाहत होते. जर लोकांना माहित झाले की, रेशन मध्ये धान्य येणार आहे. तर लोकं 'गोधड्या' अंथरून दोन-तिन दिवस आधी पासून नंबर लावायचे. रेशनवर लाल गहू, लाल ज्वारी असे परदेशातून आयात केलेले धान्य मिळायचे. समाधानाची बाब म्हणजे ३०% गावात 'लाईट' पोहोचलेली नव्हती. त्यामुळे विहीर खोदली की, पाणी लागत होते. 

     आज परिस्थिती वेगळी आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. पाणी टंचाई जाणवली की, टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जातो. लातूर सारख्या शहराला टंचाई च्या काळात रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचे आपण जाणतो. रोजगार हमी योजना कायदा सक्षमतेने राबवला जातो. मागेल त्याला काम देण्याचे धोरण आहे. मात्र आज शहरात दहा दहा फुटांवर बोअर घेतले जात आहेत. चारशे ते पाचशे फूट खोल बोअर घेवूनही पाणी लागेलच याची शाश्वती नाही. विहिरी सहा महिन्यांत कोरड्याठाक पडत आहेत. बारमाही वाहणा-या नद्या फक्त पाऊस पडला तितकाच वेळ वाहत आहेत. त्यामुळे हे नैसर्गिक देणं जबाबदारीने वापरले पाहिजे. आणि शाश्वत टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर


Comments

Popular posts from this blog

बालपण हरवत चाललंय

दरडी का कोसळतात?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात