ड्रोन 🚡 तंत्रज्ञान
ड्रोन 🚡 तंत्रज्ञान
लग्नकार्य किंवा सार्वजनिक समारंभात ड्रोन कॅमेरा वापर आपण जवळून अनुभवलेला आहे. आज आपण ड्रोन म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ड्रोन उडतात, ते फोटो काढतात, वन्य प्राण्यांना वाचवतात, इतकेच काय तर भुकंपात अडकलेल्या लोकांची सुटका सुद्धा करू शकतात. मिलिटरीला दुर्गम भागात मदत करतात. ड्रोन म्हणजे कॅमेरा 📷 आणि काही सेन्सर असलेला उडणारा संगणक म्हणजे ड्रोन होय. ड्रोनला UAV म्हणजे unmanned Aerial🚡 vehicles किंवा Dynamic Remotely Operated Navigation 🧭 Equipment असे म्हणतात. ड्रोनला अशा ठिकाणीही सेट केले जाते, जिथे मानव पोहोचणे अशक्य आहे. ड्रोनला आकाशाचा डोळा देखील म्हटले जाते. तो अनेक काम करू शकतो. मुख्यतः अशा कामासाठी त्याला तयार केले गेले आहे जे मानवांसाठी स्वतः करणे धोकादायक आहे. मुळात हे लघु रोबोट्स आहेत, जे उडण्यास सक्षम आहेत. ज्यामध्ये ते रिमोट कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने नियंत्रित केले जातात. मानवी आवाक्या बाहेरील किंवा धोकादायक आणि कठीण अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन तंत्रज्ञान दिवसेंदिवस नवनवीन शोधांच्या मदतीने विकसित होत आहे. मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानामध्ये ड्रोनचे एरोडायनॅमिक्स, ते बनवण्यासाठी वापरलेली सामग्री, सर्किट बोर्ड, चिपसेट आणि सॉफ्टवेअर यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे, ज्याला ड्रोनचा मेंदू देखील म्हणतात. तसं पाहिलं गेलं तर ड्रोन वापरायची सुरत १९०७ साली झाली, मात्र रिमोट ड्रोनचा वापर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने १९४३ साली पहिल्यांदा केला.
ड्रोनचा वापर:-
- फोटो काढणे
- व्हिडिओ शूट करणे
- वस्तूंचे ई-कॉमर्स वितरण
- राष्ट्रीय महामार्ग मॅपिंग
- रेल्वे ट्रॅक मॅपिंग
- जंगलावर नजर ठेवण्यासाठी
- शेती व शेती संलग्न कामे. उदा.औषध फवारणी
- दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी
- संशोधन करण्यासाठी
- रेस्क्यू ऑपरेशन ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी
- जयंती,सण, उत्सवातील गर्दीवर नियंत्रण
ड्रोन कसे उडते:-
ड्रोनचे चार प्रोपेलर उभ्या दिशेने स्थिर आणि ओरिएंट केलेले आहेत. प्रत्येक प्रोपेलरमध्ये एक परिवर्तनीय आणि स्वतंत्र गती असते, जी त्यास हालचालीची संपूर्ण श्रेणी सेट करण्यास परवानगी देते. वेगवेगळ्या ड्रोन मध्ये वेगवेगळे प्रोपेलर कॉम्बिनेशन असतात जे त्यांना वेगवेगळ्या ड्रोन हालचाली साध्य करण्यास मदत करतात. ब्लेड पीच बनवण्यासाठी जे घटक वापरले जातात ते खूप मौल्यवान आहेत, म्हणून हे क्वाड क्वॉप्टर आता अधिक वापरले जात आहेत. ड्रोन अतिशय हलक्या संमिश्र सामग्रीचे बनलेले असते, ज्यामुळे वजन कमी करता येते आणि एकाच वेळी नियंत्रण करता येते. संमिश्र सामग्रीमूळे ड्रोनला एक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे ते खूप उंच उडू शकतात. ड्रोन इन्फ्रारेड कॅमेरे, जीपीएस आणि लेझर अशा विविध तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
ड्रोनचे प्रकार:-
रोटरी ड्रोन आणि फिक्स्ड विंग ड्रोन असे सर्वसाधारणपणे ड्रोनचे दोन प्रकार आहेत. .
रोटरी ड्रोनचेही काही प्रकार आहेत-
- अ) सिंगल रोटर:- यात फक्त एकच रोटर पोझिशन आहे. मागील बाजूस एक टेल रोटर आहे, जो त्यास नियंत्रित करतो.
- ब) ट्राय कॉप्टर:- यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तिशाली मोटर्स, तीन कंट्रोलर्स, चार गायरो आणि एक सर्वो मोटर असते.
- क) क्वाड कॉटर:- यात चार रोटर ब्लेड वापरतात. यात ब्रशलेस प्रकारच्या डीसी मोटर्सचा वापर करण्यात येतो. यात दोन मोटर्स घड्याळाच्या दिशेने फिरतात. तर दोन मोटर्स घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. लिथियम पॉलीमर बॅटरी 🔋 यासाठी वापरतात.
- ड) हेक्सा कॉप्टर:- यासाठी ६ रोटर ब्लेड वापरतात. ज्यात ३ मोटर्स घड्याळाच्या दिशेने फिरतात तर ३ मोटर्स घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. यातील 🛬 लँडिंग सर्वात सुरक्षित असते.
- इ) ऑक्टा कॉप्टर:- यात ८ मोटर्ससह ८ फंक्शनल प्रोपेलर वापरले जाते. नैसर्गिकरित्या उच्च उड्डाण क्षमता असून त्याची स्थिरता सर्वोत्तम असते.
- फिक्स्ड विंग ड्रोन:- याची डिझाईन सुद्धा मल्टी मोटर डिझाईन पेक्षा बरेच वेगळे असते. यात पारंपरिक ठिकाणासारखे पंख दिसतात. ते हवेत फारशे स्थिर नसतात. त्यांच्या हालचालींसह, गुरूत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव जास्त जाणवतो. तसेच ते क्वाड कॉप्टर्सच्या तुलनेत जास्त वजन पेलवू शकत नाही.
- VTOL ड्रोन:- (vertical take-off and landing) हे सहजपणे टेक ऑफ करू शकतात व उभ्या उतरू शकतात.
ड्रोन-यूएव्ही तंत्रज्ञान:-
ड्रोन मध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. रडार पोझिशनिंग आणि रिटर्न होम तंत्रज्ञान हे ब-याच नवीनतम ड्रोनमध्ये GPS आणि GLONASS सारख्या ड्युअल ग्लोबल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) आहे.
वजनानुसार त्याचे पाच प्रकार आहेत.
- नॅनो ड्रोन - २५० ग्रॅम पर्यंत, हे उडवण्यासाठी परवाना लागत नाही.
- मायक्रो ड्रोन - २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंत, हे उडवण्यासाठी UAS Operator Permit-I कडून परवानगी घ्यावी लागते व ड्रोन पायलटला SOP चा अवलंब करावा लागतो.
- मिनी ड्रोन - २ ते २५ किलोपर्यंत,
- लहान ड्रोन - २५ ते १५० किलोपर्यंत
- मोठे ड्रोन - १५० किलोपेक्षा जास्त
मिनी, लहान व मोठ्या ड्रोन उड्डाण करण्यासाठी डीजीसीए कडून परवानगी घ्यावी लागते.
ड्रोन मानवासाठी धोकादायक ठरू शकतो:-
ड्रोन च्या सहाय्याने मानव चांगली कामे करू शकत असला तरी हे तंत्रज्ञान दहशतवाद्यांसारख्या चूकीच्या हातात गेले तर याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. याचा वापर करून दहशतवादी स्वायत्त हल्ले करू शकतात. युक्रेनने रशियन शहरावर केलेला ड्रोनहल्ला, जम्मू-काश्मीर मधील जम्मूच्या हवाई दलाच्या स्टेशनवर दोन ड्रोनच्या मदतीने घडवून आणलेला स्फोट या चिंतेच्या बाबी आहेत. काही देशांत सैनिकांचे शस्त्रसाठा ड्रोनच्या मदतीने उध्वस्त केल्याची उदाहरणे आहेत. चेहरा शोधण्याचे तंत्र वापरून त्या व्यक्तीचा चेहरा शोधून ड्रोन गोळीबार करू शकतो किंवा 💣 बॉम्ब, ॲसिड टाकू शकतो. इराण वरील यूएसए ने केलेला हल्ला आणि सौदीच्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला ही ऑटोनॉमस अटॅक ची ताजी उदाहरणे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) चार ड्रोनमध्ये वापर धोकादायक सुद्धा ठरू शकतो. AI च्या बळावर ड्रोन स्वतः हून मानवांवर आक्रमण करू शकतो.
जगातील काही धोकादायक ड्रोन:-
- तुर्कस्तान- Bayraktar Makina या तुर्की एरोनॉटिकल कंपनीने तुर्की सैन्यासाठी 'Bayraktar-TB' हे ड्रोन तयार केले आहे. हा ड्रोन २५००० हजार फुट उंचीवरून सलग २७ तास उड्डाण करू शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राउंड सिस्टीमशिवाय टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतो. १५० किलो पेलोडसह ताशी १२२ किमी वेगाने उड्डाण करू शकतो. याचे वजन ७०० किलो आहे. तुर्कीचा हा अतिशय धोकादायक ठरू शकणारा ड्रोन आहे. तो हवाई युद्धात माहिर असून क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.
- रशिया- 'सिरियस' हा रशियाचा मानवरहित ड्रोन ताशी १८० किमी वेगाने २३००० फूट उंच उड्डाण घेणारा आहे व. एका फ्लाइट मध्ये ३००० किमी अंतर कापतो. ३०० ते ४०० किलो वजनाची शस्त्र घेऊन उड्डाण करण्यास सक्षम आहे. युक्रेन युद्धात रशिया ने या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.
- इस्त्राईल- 'हेरॉन' हा ड्रोन इस्त्रायलच्या संरक्षण ताफ्यातील असून २७०० किलो पेलोडसह उड्डाण क्षमता आहे. तो ताशी ४०७ किमी वेगाने ३० तास सतत उड्डाण करू शकतो.
- अमेरिका- 'RQ-4 ग्लोबल हॅक' हा अमेरिकन ड्रोन ४० हजार चौरस मैलाचे निरीक्षण करू शकतो. ९१० किलो वजनाचा हा ड्रोन घातक शस्त्र नेण्यास उपयुक्त आहे. या ड्रोनमध्ये ऍपर्चर रडार आणि थर्मोग्राफिक कॅमेरा आहे.
- चिन- 'CH-5' हा चिनी ड्रोन असून हा अत्यंत प्राणघातक आहे. १२०० किलो पेलोडसह, विनाशक ६० तास किंवा १०,००० किमी पर्यंत उड्डाणास सक्षम आहे.
- इराण- 'शहिद-१३६' किंवा 'कामिकाझे' हा इराणी ड्रोन आत्मघाती आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हल्ल्याची सूचना मिळताच आधी लक्ष्याजवळ थांबतो. दुसरी सूचना मिळताच स्फोटक बळाच्या जोरावर लक्ष्याचा वेध घेतो. त्याचे वजन २०० किलो असून पंख्याचा विस्तार २.५ मीटर आहे.
- किलर ड्रोन:- जगात अनेक सामर्थ्यशाली ड्रोन आहेत. किलर ड्रोन हे अमेरिकेने बनवलेलं ड्रोन आहे. जनरल ऑटोमिक्सने बनवलेलं MQ9 हे दोन विशेषतः सागरी युद्धासाठी वापरण्यात येतं. याचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ सर्विलियन्स नाहीतर अटॅक करण्यासाठी याचा वापर करता येतो. सॅटेलाइटने ऑपरेट करता येणारे ड्रोन ४५ हजार फूट उंच उडू शकते. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३५ तास हे ड्रोन वापरता येऊ शकते. यासोबतच यात रडार आणि अत्याधुनिक सेन्सर लावण्यात आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे या ड्रोनमध्ये मिसाईल आणि गनपावडर ठेवण्याची सुविधा आहे. भारत हा ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात आहे. मात्र त्याहीपेक्षा या ड्रोनची टेक्नॉलॉजी भारताला द्यावी, अशी भारताची मागणी आहे.सध्या असे ३० ड्रोन खरेदीचा भारताचा प्रयत्न आहे.
यातील धोके टाळता आले तर ड्रोन मानवांसाठी वरदान ठरलेला आहे. नविन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी जीवन सुकर होण्यासाठी तो लाभदायी ठरणार आहे. महापूर, दरडी कोसळण्याच्या घटना, 🗻 डोंगराळ प्रदेशात अडकलेले यासाठी ड्रोन भविष्यात नक्कीच कामी येणार आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन चे धडे देण्यासाठी विशेष 🏫 शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. तेलंगांनातील करीमनगर जिल्ह्यात हगंदारीमुक्त योजना यशस्वी करण्यासाठी उघड्यावर शौच्यावर जणार्यास आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला. किसान ड्रोन हा शेतकऱ्यांना शेतीत पेरणी, फवारणी सह विविध कामांसाठी उपयुक्त आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात ड्रोन देण्याच्या विचारात आहे.
ड्रोन आणि महाराष्ट्र:-
देशातील प्रशिक्षित ड्रोन पायलट ची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्र आणि तामिळनाडूत आहे. सध्या ७४४ प्रशिक्षित ड्रोन पायलट महाराष्ट्रात आहेत. १३६५ टक्के वेगाने ड्रोन उद्योगाने एका वर्षात वाढ केलेली आहे. राज्यात ११ ठिकाणी त्याची प्रशिक्षण केंद्रे आहेत. ड्रोन चा वाढता वापर सर्व क्षेत्रात जवळपास होत आहे. कृषी, लस वितरण, पाळत ठेवणे, शोध आणि बचाव, वाहतूक, मॅपिंग, संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी आदी क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अतिदुर्गम भाग, वैद्यकीय शस्त्रक्रिया आदींशी जोडण्यात ड्रोन यशस्वी होत आहे.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकरछत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment